Angriya Cruise थोडे पैसे साठवा पण हा अनुभव एकदा घ्याच!

340

<< श्रीरंग खरे >>

shreerang-angriya-photoमी कोकणातला असल्याने बोटीने कोकणात जाणाऱ्यांचे हाल ऐकून होतो. माझे आजोबा आणि त्यांचा मोठा भाऊ बोटीने कोकणात गेलेही आहेत आणि मुंबईलाही आलेत. बराच मोठा प्रवास, कडक ऊन, खचाखच गर्दी या सगळ्या दिव्यातून प्रवास करत ते कोकणात जायचे. कोकण सेवक आणि कोकण शक्ती या दोन बोटींनी हा प्रवास व्हायचा, मात्र त्या बंद पडल्याने आपल्याला बोटीने कधी कोकणात जाता आलं नाही, याची खंत सतत मनात होती. हे दु:ख पूर्णपणे नाही पण काही अंशी दूर करता आलं ते आंग्रिया या नव्याने सुरू झालेल्या क्रूझ सेवेमुळे. सुख यासाठी आहे कारण कोकणातील समुद्रसंपदा जवळून पाहण्याची संधी या क्रूझमुळे मिळणार आहे, दु:ख यासाठी आहे कारण ही क्रूझ रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवण, वेंगुर्ले अशी कुठेही न थांबता थेट गोव्यात जाणार आहे.

angriya-boardबस, ट्रेन, विमान या तिन्ही मार्गांनी प्रवास केलेल्या माझ्यासारख्या माणसाचं बोटीने लांबचा प्रवास करणं हे स्वप्न होतं. बातम्यांसाठी मी कोणतीही सुरक्षा नसलेल्या मासेमारांच्या बोटीतून प्रवास केला आहे, मात्र मोठ्या बोटीतून प्रवास करता आला नव्हता. त्यामुळे आंग्रिया क्रूझ केव्हा सुरू होतेय यावर मी बारीक लक्ष ठेवून होतो. योगायोग असा की काही पत्रकार मंडळींना ही क्रूझ जवळून पाहण्याचा अनुभव घेता आला, ज्यामध्ये मी देखील होतो. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोटीला झेंडा दाखवला आणि प्रवास सुरू झाला. मात्र प्रवास सुरू झाल्यानंतरही बरेच तास आम्ही मुंबईतच होतो. साधारणपणे सात-आठच्या सुमारास आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवरून ही बोट निघाली आणि गेटवे ऑफ इंडियाजवळ येऊन थांबली. कोणत्याही बोटीच्या पहिल्या सफरीचा आनंद साजरा करण्यासाठी आतषबाजी केली जाते, मात्र या बोटीसाठी लेझरशो आयोजित करण्यात आला होता. लेझर शो झाल्यानंतर बोटीमध्ये इंधन भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला तो रात्री जवळपास 11 पर्यंत सुरू होता.

angriya-cruise-in-deep-oceaमी बोटीवर दुपारी 1 च्या सुमारास चढलो होतो, तेव्हापासून 11 पर्यंत आम्ही बोटीमध्येच आणि मुंबईमध्येच घुटमळत होतो. मधल्या काळात आम्ही संपूर्ण बोटीचा फेरफटका मारला आणि बोटीच्या मालकांशी, कॅप्टनशी आणि इतरांशी संवाद साधत होतो. माझ्याप्रमाणेच बोटीवर आलेल्या प्रत्येकाला बोटीबाबत प्रचंड उत्सुकता होती. या बोटीमध्ये हॉटेलप्रमाणेच विविध प्रकारच्या खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. बोटीमध्ये 104 खोल्या असून त्यांचे दर वेगवेगळे आहेत. खोल्याचे एकूण 8 वेगवेगळे प्रकार असून यामध्ये डबल बेड असलेल्या मोठ्या खोल्या, चार जण झोपू शकतील अशा बंक बेडची व्यवस्था असलेल्या खोल्या, डॉरमेट्रीमध्ये जसे रांगेत कॉट टाकलेल्या असतात तशाच पद्धतीची बंक बेड असलेली खोली, पॉडस असे खोल्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. या क्रूझची प्रवासी क्षमता जवळपास 350 ची असून तिकीटाचे दर चांगल्या खोलीसाठी 12000 प्रती माणूस इतका आहे. डॉरमेट्रीसाठी हा दर 4300 इतका आहे. खाण्या-पिण्याचा खर्च वेगळा असून त्यासाठी 2 हजार रूपये आकारले जातात. क्रूझवर बाहेरचे खाद्यपदार्थ आणण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

angriya-6आंग्रिया ही सात मजली क्रूझ बोट असून यामध्ये 2 रेस्टॉरेंट, 6 बार, 24 तास सुरू राहणारं कॉफी शॉप, स्पा स्विमिंग पूल आणि सगळ्यांसाठी आकर्षण ठरणारे दोन डेक आहेत. ही बोट कोकणात का थांबत नाही याचं उत्तर आम्ही कॅप्टनशी बोलताना मिळवलं. क्रूझच्या थांब्यासाठी खोल पाण्याची गरज असते आणि तशा जेट्टीही उभाराव्या लागतात. कोकणामध्ये तशा जेट्टींची व्यवस्था नसल्याने ही क्रूझ इच्छा असूनही तिथे नेता येऊ शकत नाही असं कॅप्टन्सनी सांगितलं. सरकारने कोकणात जेट्टीची व्यवस्था केली तर तिथे क्रूझला थांबा देण्याचा विचार करता येऊ शकतो असंही त्यांनी सांगितलं.

angriya-3आम्ही ही बोट सेवा सुरू करण्यासाठी प्रचंड धडपड करणाऱ्या सी ईगल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी बोलताना ठासून सांगितलं की “ ही सेवा मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गासाठी आहे” . परदेशात जाऊन किंवा परदेशात जाणाऱ्या क्रूझचा अनेकांना आनंद घेता येत नाही. याचं मुख्य कारण हे आहे की या क्रूझच्या सफरी दीर्घकाळाच्या असतात. त्यांचे दर हे मध्यमवर्गाच्या आवाक्याबाहेरचे असतात. आंग्रिया क्रूझचा प्रवास 14 ते 15 तासांचा आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रूझच्या तुलनेत तिकीटाचे दर हे खूपच कमी आहेत. यामुळे या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास किरण ठाकूर यांनी व्यक्त केला.

leena-kamat-prabhuसंचालिका लीना कामत-प्रभू यांनी बोलताना सांगितलं की बोटीवरची जवळपास सगळी मंडळी ही मराठी आहेत. मधल्या काळात काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी उत्तर भारतीय मुंबई सोडून गेले तर तर शहर ठप्प पडेल असं विधान केलं होतं. या विधानाच्या पार्श्वभूमीवर मी लीना कामत यांना प्रश्न विचारला की तुम्हाला असं खरंच काही वाटतं का? यावर त्या हसून म्हणाल्या की “ मराठी तरुणाला जबाबदारीची जाणीव करून देणं गरजेचं आहे, एकदा का त्याला ही जाणीव झाली की तो कोणतंही काम आपलं मानून करतो” बोटीवरच्या मराठी कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांना जेवणातील मराठी पदार्थांच्या आग्रहाबद्दलही आम्ही विचारलं, कारण सकाळी नाश्त्यामध्ये बटाटे वडे, उसळ असे पदार्थ होते, तर दुपारच्या जेवणात भरली वांगी, काळ्या वाटाण्याची उसळ, झुणका, भाकरी असा मेन्यू होता. लीना कामत-प्रभू म्हणाल्या की आम्ही मराठी संस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न प्रवाशांना करतोय आणि जेवण हा त्यातील अविभाज्य भाग आहे. मात्र आम्ही मराठी पदार्थांसोबतच इटालियन पदार्थही ठेवतोय जेणेकरून कोणाचीही जेवणाखाण्यात अडचण होणार नाही.

20 ऑक्टोबर रोजी ही बोट मुंबईहून निघाली. त्याच रात्री मुंबई सोडल्यानंतर देशातील बोटीवरचं पहिलं लग्न झालं. बोटीच्या कॅप्टनला लग्न लावण्याचा अधिकार असल्याने त्यानेच बोटीवर हे लग्न लावलं. ही बाब आमच्या सगळ्यांसाठी नवीन होती. या लग्नानंतर डेकवर चंद्रप्रकाशात समुद्र पाहात राहणं हे स्वर्गीय आनंद होता. ही दृश्य मनातल्या हार्डड्राईव्हवर आयुष्यभर साठवून ठेवत झोपायला गेला. 21 ऑक्टोबरला पहाटे पाचच्या सुमारास जाग आली. सहाच्या सुमारास उजाडायला लागलं होतं. बोटीवरून सुर्योदय पाहण्याची जबरदस्त इच्छा होती. डेकवर पोचलो तेव्हा कळालं की ही इच्छा असणारा मी एकटा नव्हतो. सातच्या सुमारास लालबुंद सूर्याचा गोळा क्षितिजावर सरसर वर चढत जात होता. कामावर आल्याची त्याने वर्दी दिली होती कारण आता थंड हवा गायब झाली होती आणि अंग घामाघूम व्हायला सुरुवात झाली होती.

angriya-5

साधारणपणे 1 च्या आसपास बोटीने गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला आणि दुपारी दोन वाजता ती बंदरात येऊन उभी राहिली. बोटीचं स्वागत करण्यासाठी नेव्हीचा बँड होता आणि गोव्यातील पत्रकारही होते. जवळपास 15 तासांनी मुंबईहून मी गोव्याला पोहोचलो. आयुष्यातील अविस्मरणीय अनुभवांपैकी हा एक अनुभव होता. पावसाळ्याचे दिवस सोडले तर ही बोट एक दिवसाआड सुरू राहणार आहे. 24 तारखेपासून या बोटीची प्रवाशांसोबत पहिली सफर सुरू होणार आहे. मराठी माणसाने मराठी माणसांसोबत सुरू केलेली ही क्रूझ असल्याने मला जरा जास्तच अभिमान आहे. या बोटीचा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा असं माझं स्पष्ट मत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या