निळं शहर

257

>> द्वारकानाथ संझगिरी

जोधपूरला ‘सूर्याचं शहर’ (सन सिटी) असं म्हणतात. कारण तिथे उत्कृष्ट सूर्यप्रकाश असतो. त्याला ‘निळं शहर’ही म्हणतात. जैसलमेर हे सोनेरी शहर आहे. जयपूर गुलाबी शहर तसे जोधपूर निळं शहर (ब्लू सिटी). कारण जुन्या शहरातल्या इमारतींना निळा रंग दिलाय. वर्षभर सूर्य तळपत असल्यामुळे घरं थंड राहावीत म्हणून ‘निळाई’चा वापर केला जातो असे म्हणतात.

सौंदर्याचा विचार केला तर जोधपूरचा मेहरानगढ बिकानेरच्या जुनागढपेक्षा जास्त सौंदर्यशाली आहे. 1459 मध्ये तो राव जोधाने बांधला. तो मुख्य शहरापेक्षा 410 फुटांवर आहे. नागमोडी वळणे घेत रस्ता खालच्या शहरातून किल्ल्याकडे जातो. किल्ल्याला जाताना द्वारं लागतात. त्यातल्या दुसऱया दरवाजावर अजूनही जोधपूरच्या सैन्याने डागलेल्या तोफांच्या खाणाखुणा दिसतात. जखमा मिरविणारे दरवाजे मला आवडतात. तो खराखुरा इतिहास असतो. पाच दरवाजांपैकी एका दरवाजाचे नाव ‘जयपोळ’ म्हणजे ‘विजयद्वार’ आहे. त्यावेळच्या जयपूर आणि बिकानेर राज्यांच्या पराभवाची एक आठवण जोधपूरला आहे. सांस्कृतिकदृष्टय़ा कन्याकुमारी ते कश्मीर हिंदुस्थान हा एक देश वाटतो, पण ऐतिहासिकदृष्टय़ा अजूनही त्याबाबतीत कनव्हिन्स नाही. इतक्या अंतर्गत लढाया लढल्या गेल्या. अशीच एक मोगलांच्या पराभवाची आठवण या किल्ल्याचे फतेहद्वार मिरवते, पण अशा ‘गोड’ खुणा अकबराच्या काळात या किल्ल्याने पाहिल्या नाहीत.

राठोड घराण्याच्या राव जोधाने जयपूर शहर उभारले आणि ते शहर मारवाडची राजधानी झाले. तिथे किल्ला उभारण्यापूर्वी एक डोंगर होता. त्याचे नाव होते बाकुचाडिया म्हणजे पक्ष्यांचा डोंगर. दंतकथा अशी आहे की, तिथे फक्त एक साधुपुरुष राहत होता. त्याचे नाव होते चिरीयानाथजी. म्हणजे पक्ष्यांचा देव! तिथे किल्ला बांधण्याच्या वेळी त्या साधूला सांगण्यात आले ‘‘दुसरीकडे सोय बघ’’ त्याने सरळ नकार दिला. साधा एखादा नागरिक असता तर त्याचा शिरच्छेद झाला असता. तो संत माणूस आणि मागे अनेक पाठीराखे. त्यामुळे आणखी एका मोठय़ा संताला मध्ये घालण्यात आले. तिचे नाव करणीमाता. त्या संताने करणीमातेचे ऐकले, पण जाता जाता शाप दिला, ‘‘तुझ्या किल्ल्यावर नेहमी पाण्याचा दुष्काळ असेल.’’ शेवटी तो राजा हुशार राजकारणी ठरला. त्याने त्या संताला पटवून किल्ल्यावर एक घर आणि मंदिर बांधून दिलं. मौनव्रत किंवा उपवासाला बसणाऱया संतांना खिशात घालण्याची कला अशी पूर्वापार चालत आलीय. आणखी एक घृणास्पद चाल तुम्हाला पूर्वापार चालत आलेली आढळेल. हा किल्ला बांधताना एक मनुष्यबळी देण्यात आला. त्या माणसाचे नाव राजाराम मेहवाल. त्याच्यावर बळजबरी झाली नाही. तो स्वखुशीने बळी जायला तयार झाला. त्याबद्दल त्याच्या कुटुंबाची देखभाल करण्याचे वचन राजाने दिले. आजही त्या राजाराम मेहवालचे वंशज राजबागेत राहतात त्या जागेला राजाराम मेहवाल गार्डन म्हणतात.
किती चित्रविचित्र गोष्टींनी इतिहास भरलेला असतो नाही?

अकबराने हे राज्य आपल्या राज्याला 1581 मध्ये जोडले. राठोडांना अंतर्गत मालकी मिळाली, पण राठोडांचा मालक बादशहा अकबर होता. या शरणागतीचा फायदाही मारवाडला झाला. युद्ध थांबले, शांतता आणि स्थैर्य आलं. व्यापार वाढला, नव्या शैलीच्या विविध कला आणि स्थापत्य शास्त्र सर्वत्र दिसायला लागले. 1679 साली महाराजा जसवंतसिंग यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबने जप्ती आणली. औरंगजेब 1707 साली अल्लाला प्यारा झाला. पुन्हा काही युध्दे झाली. मध्यंतरीच्या काळात मालक बदलले. ‘मराठे’ मालक झाले आणि मग पुढे ब्रिटिश! 1857 साली काही राठोडांनी बंड केले. चला, ब्रिटिशांविरुद्ध राजपूत रक्त सळसळलं ते बरे वाटले. पण त्यांचा पराभव झाला आणि मग ब्रिटिश मालक बनले. या ब्रिटिशांच्या काळात तेथील व्यापाऱयांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं. ती प्रक्रिया अजून अव्याहत सुरू आहे. व्यापारातला देशाचा सार्वभौम राजा मारवाडीच आहे.

स्वातंत्र्यानंतर जोधपूरचा राजा होता हनवंत सिंग. त्याला हिंदुस्थानी संघराज्यात यायचं नव्हतं, पण वल्लभभाई पटेलांसमोर त्याचे काही चालले नाही. किल्ल्यातल्या राजवाडय़ात जे अफाट वैभव दिसते, श्रीमंती ओसंडून वाहताना दिसते ती त्या शांतता पर्वातली आहे. हा किल्ला डोंगरावर पाचेक किलोमीटर्सच्या परिसरात पसरलाय. त्या किल्ल्याकडे नुसतं पाहिल्यावर तिथल्या जाडजूड भिंती डोळय़ात भरतात. भिंती 36 मीटर्स उंच आणि 29 मीटर्स रूंद आहेत. नागमोडी रस्त्याने वर चढत जायलाच हवं असं नाही. तुम्हाला पैसे दिल्यावर लिफ्ट वर घेऊन जाते आणि वरून अख्खं शहर लख्ख दिसतं. हल्ली प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कॅमेरा असतो. सेल्फी काढता येतो. त्यामुळे वर प्रत्येक मोबाईल फोन ओव्हर टाईम करताना दिसतो. किल्ल्यातले मोतीमहल, फुलमहल, शीशमहल, सिलाहखाना आणि दौलतखाना वगैरे मोठी सौंदर्य स्थळे आहेत. त्या श्रीमंतीचा राग यायला लागतो कारण शेवटी तो पैसा कुणाचा होता? इतिहासातल्या फार थोडय़ा राजांनी प्रजेचा विचार केला.

तिथले म्युझियम एका बाजूला कलात्मकतेची भूक भागवतात. दुसऱ्या बाजूला भुकी कंगाल जनता आणि राजा यातली विषमता दाखवतात. पालख्या किती प्रकारच्या असाव्यात? आणि किती सोने-चांदीने मढलेल्या? हत्तीवर ज्या अंबारीत राजा बसे त्या तिथे ठेवल्या आहेत. पूर्ण सोनेरी. त्यात दोन खण असत. राजा बसे ती जागा प्रचंड, मागे दुसऱ्या खणात शरीररक्षक बसे. त्याला शरीर कोंबावं लागत असे. तलवारी, गेंडय़ाचे शिंग, हिऱ्या मोत्यांनी मढवलेल्या ढाली आणि सोन्या-चांदीचे कपडे घातलेल्या बंदुका वगैरे. तिथेही ऐतिहासिक तलवारी आहेत. एक राव जोधाची, दुसरी अकबराची, तिसरी तैमूरची! ढाल-तलवारीने लढताना सोनं, चांदी, हिरेमाणकं का लागतात? पण मोगल-ब्रिटिश मालक असताना त्यांना लढावं कुठे लागलं? सुंदर सुंदर मारवाडी पेंटिंग्जही पाहायला मिळतात. अर्थात डोळे तृप्तीचे ढेकर देत असताना मन शरणागत राजेशाहीबद्दलही ओरडून सांगत असते. मला वाटतं या कलात्मक सौंदर्यवान किल्ल्यांपेक्षाही भग्न झालेलं चितोड, हंपी, शिवाजी महाराजांचे किल्ले जास्त श्रीमंत आहेत. कारण त्यात शौर्याची श्रीमंती दिसते. पैशाची नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या