‘निळ्या देवमाशा’ची दस्तक

191

आतानिळ्या देवमाशाने हिंदुस्थानच्या दारावरदस्तकदिली आहे. मनप्रीतच्या रूपाने पहिला बळीही घेतला आहे. सरकारतर्फेब्लू व्हेलया गेमवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यानुसार निळ्या देवमाशाचा बंदोबस्त होईलही, पण शेवटी तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्याआभासी जगा किती मग्न व्हायचे, स्वतःची सदसद्विवेकबुद्धी या तंत्रज्ञानाकडे गहाण ठेवायची का, या प्रश्नांची उत्तरे समाजाला स्वतःलाच शोधावी आणि द्यावी लागणार आहेत. अन्यथा, कालपोकेमॉन गोहोता, आजब्लू व्हेलआला आहे. उद्या आणखी दुसरा कुठला तरीहेलयेईल आणि मानवी जीवनाचा नरक करीतच राहील.

माहिती-तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामुळे जग निश्चितपणे जवळ आले आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा भस्मासुर माणसा-माणसातील परस्परसंबंध, नात्यातील जिव्हाळा, माणुसकी आणि विवेकाचा बळी घेत सुटला आहे. पुन्हा त्याची भूक दिवसागणिक वाढतच चालली आहे. मनप्रीत सहान हा अंधेरी येथे राहणारा

१४ वर्षांचा हसतमुख शाळकरी मुलगा ‘ब्लू व्हेल’ या मोबाईलवरील गेमच्या प्रेमात पडतो काय, त्याच्या नादात स्वतःला विसरतो काय आणि गेम ऍडमिनिस्ट्रेटरच्या आदेशाचे पालन करण्यासाठी इमारतीच्या गच्चीवरून उडी मारण्याचे दुस्साहस करतो काय! हा सगळाच घटनाक्रम भयंकर आणि सध्याच्या ‘आभासी जगा’ने व्यापून टाकलेल्या भीषण ‘वास्तवा’ला पुन्हा समोर आणणारा आहे. मनप्रीतच्या आत्महत्येसंदर्भात पोलीस तपास सुरू आहे. त्यातून काय तो तपशील पुढे येईलच, पण हे रक्तरंजित वेड भविष्यात आणखी काय भयंकर उत्पात घडवेल हा विचार थरकाप उडविणारा आहे. मनप्रीत ज्या गेमचा बळी ठरला त्या ‘ब्लू व्हेल’ या गेमपायी रशियामध्ये आतापर्यंत सुमारे १३० मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. अमेरिका आणि अनेक पाश्चात्य देशांनाही या गेममुळे होणाऱ्या

आत्महत्यांनी हादरे

दिले आहेत. टाइमपास म्हणून मोबाईलवर खेळले जाणारे गेम्स जर अशा पद्धतीने खेळणाऱ्यांच्याच जिवावर उठू लागले तर त्यांना खेळ म्हणायचे तरी कसे? हा तर थेट मृत्यूशीच खेळ झाला! गेल्या वर्षी ‘पोकेमॉन गो’ या मोबाईल गेमने तरुणाईला वेड लावले होते. त्या वेडानेही जगात अनेकांचे बळी घेतले होते. आता ‘पोकेमॉन गो’ची जागा ‘ब्लू व्हेल’ने घेतली आहे. मोबाईलवरील गेम किंवा मोबाईलचा अतिवापर मानवी शरीर आणि आरोग्यावर कसा घातक परिणाम करतो याविषयी तज्ञ मंडळी नेहमीच इशारे देत असतात. पुन्हा मोबाईलवरच या इशाऱ्या-नगाऱ्यांचे ढोल ‘पोस्ट’ होत असतात. तरीही ना गेमचे वेड कमी झाले  आहे, ना व्हॉटस् ऍप किंवा इतर गोष्टींचे. हेडफोन कानाला लावून मोबाईलवरील गाणी ऐकण्याच्या नादात मुंबईत अनेकजण लोकल अपघाताचे बळी ठरले, पण हा नाद कायम आहे. ‘सेल्फी’चे वेड तर रोजच अनेकांचे जीव घेत आहे. त्यातूनही कुणी शहाणपणाचे धडे घ्यायला तयार नाही. ज्यांनी मुलांना त्यापासून रोखायचे ती मोठी मंडळीही सेल्फीच्या वेडात जीव धोक्यात घालीत आहे. एका अंदाजानुसार सेल्फीच्या नादात जगात किमान २७ जणांचा रोज बळी जातो. त्यातील निम्मे बळी आपल्या देशात जातात. हिंदुस्थानी जनमानसाला

सेल्फीच्या जीवघेण्या वेडाने

किती झपाटले आहे याचाच हा पुरावा आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळय़ांचेच आयुष्य या तंत्रज्ञानाने एवढे व्यापून टाकले आहे की, ‘आभासी जग’ आणि ‘वास्तव जग’ यातील सीमारेषाच जवळपास पुसली गेली आहे. या तंत्रज्ञानाने माणसाच्या विवेकबुद्धीचाही ताबा घेतला आहे. तो एवढा जबरदस्त आहे की, हे वेड जीवघेणे ठरते हे माहीत असूनही माणूस ते पांघरून ‘मृत्यूच्या पेडगाव’ला जाण्याचे थांबवण्यास तयार नाही. त्यात आता ‘निळ्या देवमाशा’ने हिंदुस्थानच्या दारावर ‘दस्तक’ दिली आहे. मनप्रीतच्या रूपाने पहिला बळीही घेतला आहे. सरकारतर्फे ‘ब्लू व्हेल’ गेमवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यानुसार सरकारी पातळीवर निळ्या देवमाशाचा बंदोबस्त होईलही, पण शेवटी तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या ‘आभासी जगा’त किती मग्न व्हायचे, स्वतःची सदसद्विवेकबुद्धी या तंत्रज्ञानाकडे गहाण ठेवायची का, या प्रश्नांची उत्तरे समाजाला स्वतःलाच शोधावी आणि द्यावी लागणार आहेत. अन्यथा, काल ‘पोकेमॉन गो’ होता, आज ‘ब्लू व्हेल’ आला आहे. उद्या आणखी दुसरा कुठला तरी ‘हेल’ येईल आणि मानवी जीवनाचा नरक करीतच राहील. ‘निळ्या देवमाशा’ने जी ‘दस्तक’ दिली आहे त्याचा हाच इशारा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या