साचलेल्या दूषित पाण्यापासून दूर राहा! लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी पालिकेचे आवाहन

518

मुंबईला गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने झोडपले असून काही ठिकाणी पाणी साचले होते. अशा साचलेल्या दूषित पाण्यातून लेप्टोचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अशा साचलेल्या दूषित पाण्यापासून मुंबईकरांनी दूर राहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसात विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागांत पाणी साचले. कधी नव्हे ते मंत्रालय, उच्च न्यायालयाचा परिसर अशा ठिकाणी पाणी साचले. मात्र, विक्रमी पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा उपसाही पालिकेच्या जल विभागाने तातडीने केला. अशा दूषित पाण्यातून जखम झालेली किंवा काही खरचटलेली व्यक्ती गेली असेल तर अशा व्यक्तीला प्लेटो होण्याचा धोका अधिक असतो. त्या पार्श्वभूमीवर, साचलेल्या दूषित पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींनी 24 ते 72 तासांच्या डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य ते औषधोपचार करावेत, अशी सूचना महापालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केली आहे.

काय आहे लेप्टोस्पायरोसिस-
‘लेप्टोस्पायरोसिस’ हा रोग ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिटस) या सूक्ष्मजंतुमुळे होतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी, बैल तसेच इतर काही प्राण्यांमुळे होतो.
संसर्गित जनावरांच्या मूत्राद्वारे दूषित झालेले पाणी वा माती या मार्फत मनुष्याला संसर्ग होतो. हा संसर्ग जखम झालेली त्वचा, डोळे, नाक याद्वारे होतो.
मनुष्यापासून मनुष्याला लेप्टोच्या संसर्गाची बाधा होत नाही.
ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्त्राव इत्यादी लक्षणे आहेत. रुग्णांना श्वासोच्छश्वास करण्यास त्रास होणे, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अशी लक्षणेही आढळतात. त्यांना योग्यवेळी औषधोपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका संभवतो.
पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावे. उंदीर-घुशींचा नायनाट करावा. उंदीर नियंत्रणासाठी उंदराचे सापळे रचणे तसेच त्यांना अन्न मिळणार नाही, अशी व्यवस्था करावी.

आपली प्रतिक्रिया द्या