शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनासाठी ५० लाखांची तरतूद

16
balasaheb-thackeray

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी १७ नोव्हेंबरला देशभरातून स्मृतिस्थळावर येणाऱ्यांना या वर्षी पालिकेच्या वतीने सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. त्याकरिता पालिका ५० लाख रुपये खर्च करणार असून पुढील वर्षापासून अर्थसंकल्पातच त्याकरिता तरतूद केली जाणार आहे. महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज यासंदर्भात पालिका प्रशासन आणि पोलीस व अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांची बैठक बोलावली होती त्यात हा निर्णय घेण्यात आला.

येत्या १७ नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुखांचा पाचवा स्मृतिदिन आहे. या दिवशी देशभरातून शिवसैनिक, सर्वसामान्य नागरिक, विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती स्मृतिस्थळावर वंदन करण्यासाठी येत असतात. आदल्या दिवसापासूच देशाच्या कानाकोपऱ्यातून श्रद्धेने नागरिक येतात आणि रांगा लावून स्मृतिस्थळाचे दर्शन घेतात. स्मृतिदिनी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी या वर्षीपासून पालिकेतर्फे विविध सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज पालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पालिका आयुक्त अजोय मेहता, सभागृह नेते यशवंत जाधव, उपमहापौर हेमांगी वरळीकर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्यासह अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे, पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), पोलीस सहआयुक्त (वाहतूक) उपस्थित होते. तसेच घनकचरा, आरोग्य अशा विविध संबंधित विभागांचे उपायुक्तही यावेळी उपस्थित होते.

पुढील वर्षापासून अर्थसंकल्पातच तरतूद
स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कवर येणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच आहे. त्यामुळे पालिकेने विविध सेवासुविधा पुरवाव्या अशी मागणी या बैठकीत सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली. या तयारीसाठी पालिकेतर्फे या वर्षी ५० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत तर पुढील वर्षापासून अर्थसंकल्पातच तरतूद केली जाईल असे आश्वासन यावेळी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिल्याची माहिती सभागृह नेत्यांनी दिली.

या सोयीसुविधा देणार
– दोन हजार चौ. मीटरचा विसावा मंडप
– आरोग्य केंद्र
– पिण्याच्या पाण्याची सोय
– व्हीआयपींसाठी मंडप
– रांगेत उभे राहणाऱ्यांसाठी शेड
– अग्निशमन दलाची यंत्रणा, रुग्णवाहिका,
– मैदानाची साफसफाई, गार्डनिंग, लॅण्डस्केपिंग याचीही जबाबदारी पालिका घेणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या