पालिका परिचारिकांना पाच दिवसांच्या आठवड्यासाठी आठ दिवसांत निर्णय घेणार

मुंबई महानगरपालिकेच्या परिचारिकांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाकडून याबाबत आश्वासन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अजय चौधरी यांनी सहआयुक्त आणि प्रभारी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत संघटनेकडून सर्व रुग्णालयांतील सध्याची व्यवस्था, परिचारिकांची संख्या, डय़ुटीच्या पद्धतीचा पॅटर्न मागवला आहे. हा पॅटर्न मिळाल्यानंतर आठ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या धर्तीवर पालिकेतील परिचारिकांना पाच दिवसांचा आठवडा, आठवडय़ातून दोन दिवस रजा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र याची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर नुकतेच सर्व रुग्णालयांतील परिचारिकांकडून गणवेश परिधान करून एफ/दक्षिण विभाग कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास तात्पुरते स्थगित केलेले आंदोलन अधिक तीव्र करून सामुदायिक रजा आंदोलन करण्यात येईल असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सरचिटणीस अॅड. रचना अग्रवाल यांच्याकडून देण्यात आला होता. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव त्वरित पाठवून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी वर्गाची मान्यता घेण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

या पार्श्वभूमीवर आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रशासनासोबत निर्णायक चौकशी केली. पालिकेत परिचारिकांसाठी पाच दिवसांचा आठवडा केल्यास कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पालिकेवर पडणार नसल्याचे, सलग कामामुळे परिचारिकांवर कामाचा ताण येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी सरचिटणीस अॅड. रचना अग्रवाल, सत्यवान जावकर, उपाध्यक्षा रंजना नेवाळकर, चिटणीस वृषाली परुळेकर, मंगला तावडे आदी उपस्थित होते.

रिक्त पदे भरणार
पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर या मोठय़ा रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालयांमध्ये एकूण सहा हजार परिचारिका काम करीत आहेत. यामध्ये शेकडो पदे रिक्तही आहेत. त्यामुळे ही पदे भरण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर परिचारिकांची 450 पदे तातडीने भरण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष बाबा कदम यांनी दिली.