नटलेल्या ‘ट्राम’ला आचारसंहितेचा ब्रेक

सामना ऑनलाईन । मुंबई

ऐतिहासिक आणि ब्रिटिशकालीन ‘ट्राम’ मुंबईकरांच्या भेटीला लवकरच येणार आहे. मात्र आचारसंहितेमुळे नवी मुंबईच्या रबाळे येथील गॅरेजमध्ये नटूनथटून तयार असलेली ‘बेस्ट’ची ट्राम हिरव्या सिग्नलच्या प्रतीक्षेत आहे. फोर्ट येथील पालिका मुख्यालयाच्या समोरील भाटिया उद्यानामध्ये ही बस मुंबईकरांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

जुन्या मुंबईची लाइफलाइन असणारी ‘बेस्ट’ची ट्राम बस 31 मार्च 1964 पासून बंद करण्यात आली. कालौघात मुंबईतील ट्रामचे रूळही दिसेनासे झाले. मात्र ट्रामविषयी मुंबईकरांच्या मनात आजही आकर्षण आणि उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आजच्या पिढीतील मुंबईकरांना ऐतिहासिक ट्रामची ओळख व्हावी म्हणून प्रदर्शनाच्या रूपाने भाटिया गार्डनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रामचा डबा रबाळे येथील ऍन्थोनी गॅरेज येथे तयार करण्यात आला आहे. दीड महिन्याच्या अथक परिश्रमाने ट्रामचा नवीन डबा तयार करण्यात आला आहे. 33 फूट लांब असलेल्या ट्राममध्ये 20 ते 25 प्रवासी बसण्याची क्षमता असेल. बैठक व्यवस्थाही जुन्या बसप्रमाणे असेल. शिवाय ट्रामला रंगही जुन्या बसप्रमाणेच देण्यात आला आहे. त्यामुळे ट्रामचा डबा जुन्या रूपात हुबेहूब पाहता येणार आहे. मात्र आचारसंहितेमुळे हेरिटेज कमिटीची परवानगी रखडल्याने मुंबईकरांना निवडणूक संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबईकर-पर्यटकांना पाहण्यासाठी मार्च-एप्रिलमध्ये ट्राम भाटिया उद्यानामध्ये दाखल होणार होती.

असा झाला ‘ट्राम’चा प्रवास

  • 9 मे 1874 रोजी घोडय़ांद्वारे ओढली जाणारी पहिली ट्राम मुंबईमध्ये धावली. सुरुवातीला ट्रामच्या तिकिटाचा दर हा तीन आणे होता. सुरुवातीला छापील तिकीट नव्हते. प्रवाशांच्या काढत्या प्रतिसादानंतर तिकिटाचा दर दोन आणे झाला. त्यानंतर काही महिन्यांनी तिकिटे छापण्यात आली.
  • 1905 मध्ये ‘बेस्ट’ म्हणजेच ‘बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय ऍण्ड ट्राम’ कंपनीची स्थापना झाली. 1907 मध्ये घोडय़ांच्या सहाय्याने ओढल्या जाणाऱ्या ट्राम बंद करण्यात आल्या. त्यानंतर मुंबईमध्ये पहिली इलेक्ट्रिक ट्राम धावली.
  • 1926 मध्ये डबल डेकर ट्रामही शहरात आली. कंपनीने शहरामध्ये बससेवा सुरू करण्यासाठी निर्णय घेतला.
  • 15 जुलै 1926 मध्ये शहरात पहिली बस अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट मुंबईच्या रस्त्याकर धावली.