पालिका गटनेता बैठकीत विरोधकांचा गोंधळ; आयुक्तांच्या अनुपस्थितीवरून गटनेत्यांचा सभात्याग

294

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गेले चार महिन्यानंतर पालिका मुख्यालयात सोमवारी पहिल्यांदाच महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल हे सभागृहात अनुपस्थित राहिल्याने विरोधकांनी गोंधळ घालत सभात्याग केला.

कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेले चार महिने पालिका मुख्यालयात कोणत्याही समितीची बैठक झाली नाही. मात्र, आज महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 4 वाजता महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहात गटनेत्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, आयुक्तालयात असूनही इकबालसिंह चहल सभेला समिती सभागृहात उपस्थित नव्हते. त्यांनी आपल्या दालनातूनच व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. त्यावर गटनेत्यांनी पालिका आयुक्तांनी समिती सभागृहात येण्याचा आग्रह धरला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, नगरसेवक, गटनेते यांच्या पत्रांना प्रशासनाकडून उत्तरे दिली जात नाहीत, परिणामी त्यांचे नागरी समस्यांबाबतचे विषय मार्गी लागत नाहीत. वैधानिक समित्या, प्रभाग समित्यांच्या सभा घेण्यात येत नाहीत. तातडीच्या कामांना निधी मंजूर न झाल्यामुळे सभागृहात अडचणी निर्माण होत आहेत. सर्व गटनेते प्रत्यक्ष येऊनही आयुक्तांनी प्रत्यक्ष उपस्थितीला नकार दिला. सुरक्षित अंतर राखण्याच्या नावाखाली टाळाटाळ करत आहेत, असा आरोप करत विरोधी पक्ष नेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी सभात्याग केला.

आयुक्तांनी राज्य सरकारच्या नियमांचे पालन केले! -महापौर

पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन केले आहे. प्रत्येक जण स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेत असतो. त्यामुळे आयुक्त सभागृहात आले नाहीत. त्यात सभागृहाचा किंवा कोणाचाही अपमान करण्याचा त्यांचा उद्देश नाही. मात्र, पालिका आयुक्तांनी या पुढे त्यांच्या बैठकांचे आयोजनही व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे करावे, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या