पालिकेच्या सफाई कार्याला सलाम! सलग तीन दिवस नृसिंहवाडी येथे राबवली स्वच्छता मोहीम

562

शिरोळ तालुक्यात महापुराच्या जलप्रलयाचा मोठा फटका बसला, यामध्ये दत्तक्षेत्र असलेले नृसिंहवाडीही बचावले नाही, श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातल्याने सारे काही वाहून गेले आणि जाताना या पुराच्या पाण्याने सर्वत्र कचरा टाकाऊ वस्तू याचे साम्राज्य करून गेले. यातच या कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि रोगराईला आमंत्रण मिळालं. पूर ओसरला, मात्र गाव स्वच्छतेचा मोठा यक्षप्रश्न नृसिंहवाडी सारख्या छोट्या ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या समोर उभा राहिला. मात्र यासाठी या क्षेत्रावर श्रद्धा असणारे मुंबईकर पुन्हा एकदा धावून आले.

नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र पुराच्या पाण्यात पूर्ण बुडाले होते गावामध्ये सरसर पंधरा फूट पाणी वेगाने वाहत होते. या वेगाने वाहणाऱ्या पाण्यात बरोबर गावात चिखल कचरा मोठ्या प्रमाणात वाहून आला. या अनपेक्षित जलप्रलयामुळे गावात सर्वत्र दलदलीचे साम्राज्य पसरले. या दत्त क्षेत्रावर महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा राज्यातील दत्तभक्तांची यांची नितांत श्रद्धा आहे. यात मुंबईकरही कुठे मागे नाहीत, कारण त्यांनी आज आपल्या शब्दाबरोबर कार्याची जिगर दाखवून दिली. पूर ओसरला आणि स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व आयुक्त यांनी150 स्वच्छता कर्मचाऱ्यांची फौज तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेसाठी पाठवली आणि या कार्यासाठी पालिकेचे सहाय्यक आयुक्त या स्वच्छता कार्याच्या देखरेख करण्यासाठी आले.

मुंबई महापालिकेच्या या स्वच्छता दूतांनी गेल्या तीन दिवसापासूनआपले काम अव्याहतपणे सुरू केले. स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामग्री कर्मचारी सुसज्ज होते. नृसिंहवाडीत पोहोचताच कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे काम सुरू केले. दिवसभर स्वच्छता मोहीम करीत असताना त्यांनी तहान भुकेची पर्वा केली नाही. स्वच्छता करत असताना गावात सर्व भागात इतकी दलदल, चिखल आणि दुर्गंधी होती की, तिथे जाणंही कठीण होतं. अशी अवस्था असताना देखील या सफाई कर्मचाऱ्यांनी याची तमा न बाळगता गावकऱ्यांशी संवाद साधत, त्यांची मदत घेत हसतमुखाने स्वच्छता मोहीम राबवली. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी दत्त क्षेत्राच्या जागृत क्षेत्री आम्ही स्वच्छता करत असल्यामुळे आम्हाला एक प्रकारचा आत्मिक आनंद मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

श्री क्षेत्र नृसिंहवाडीची स्वच्छता करण्यासाठी मुंबईतील प्रत्येक प्रभागातील पाच निवडक सफाई कर्मचाऱ्यांची आयुक्तांनी निवड करून 150 लोकांचं पथक पाठवलं होतं. हे पथक गावातील सर्व गल्ली-बोळ, रस्ते, दत्त मंदिर मार्ग, गटार, ड्रेनेजसह प्रत्येकाच्या घराभोवतीचा परिसर स्वच्छ करून तो कचरा आपल्या साधनांच्या साहाय्याने ट्रॅक्टर, ट्रॉली, डंपर यातून भरून पाठवत आहेत. हा कचरा शिरोळ मार्गावरील मारुती मंदिरासमोर असलेल्या ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेत एकत्रित केला जात आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी करत असलेले काम हे अत्यंत जोखमीचे आणि कठीण आहे. मात्र दत्त महाराजांची सेवा म्हणून काम करण्याची भावना प्रत्येकात असल्यामुळे त्यांच्या या कार्याला समस्त नृसिंहवाडीकर ग्रामस्थ सलाम करत आहेत.

दीड तासात केला मंदिर मार्ग स्वच्छ
नृसिंहवाडीच्या स्वच्छतेसाठी आलेल्या बृहन्मुंबईच्या सफाई कर्मचाऱ्यांनी रविवारी श्रींची उत्सवमूर्ती मंदिराकडे जाण्यासाठी सज्ज झाली असताना अवघ्या दीड तासात मंदिरापर्यंत असणारा मिरवणुकीचा मार्ग चकाचक व स्वच्छ करून टाकला.

आपली प्रतिक्रिया द्या