मुंबईत 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वे मार्ग ठप्प झाल्याने मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागल्यामुळे पालिकेवर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आज पालिका प्रशासक आयुक्त भूषण गगराणी यांनी रेल्वेसह पालिकेच्या संबंधित विभागांची मॅरेथॉन बैठक घेतली. यावेळी रेल्वे हद्दीमधील नाल्याची सफाई संबंधित यंत्रणांनी वर्षभर करावी आणि नाल्यांचे रुंदीकरण, पंपांची संख्या वाढवणे, दुरुस्ती आदी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देशही यावेळी बांगर यांनी दिले.
मुंबई महानगरात जोरदार पावसाप्रसंगी उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांनी समन्वयाने कार्यरत राहिले पाहिजे. नाल्यातील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळाखालील व इतर ठिकाणीदेखील बंदिस्त मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करणे ही कामे केवळ पावसाळापूर्व अथवा पावसाळय़ातच, नव्हे तर संपूर्ण वर्षभर सुरू राहिली पाहिजेत. उपनगरीय लोहमार्गावर रुळाखालील नाल्यांच्या प्रवाहामधून गाळ काढणे, लोहमार्गाची स्वच्छता करणे ही कामे कमीतकमी कालावधीत पूर्ण केली जावीत, जेणेकरून लोहमार्गावर पाणी साचण्याच्या घटना पुन्हा घडणार नाहीत याची खबरदारी बाळगावी, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.
200 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने समस्या
मुंबईत 25 सप्टेंबर रोजी अवघ्या काही तासात 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळला. त्यामुळे उपनगरीय रेल्वे सुविधा बाधित झाली. रेल्वे मार्गावर पाणी साचण्याच्या घटना घडल्याने मध्य रेल्वेची सेवा प्रभावित झाली. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी आज पालिका मुख्यालयात रेल्वे प्रशासन, महानगरपालिका पर्जन्य जलवाहिन्या विभाग, पूल विभाग आणि रस्ते विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
असे होणार काम
काही ठिकाणी रेल्वे रुळाखालील भाग अरुंद असल्याने त्याचे विस्तारीकरण करण्याची विनंती रेल्वे विभागाने केली. त्यापैकी काही कामे रेल्वे विभाग महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या निधीतून करणार असून, काही कामे महानगरपलिकेने करावीत, अशीदेखील विनंती रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. तसेच काही भागांमधील रेल्वे भाग वगळता निवासी भागातील पावसाळी जलवाहिनी जाळ्यांचे विस्तारीकरणाची बाब रेल्वे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. महानगरपालिकेकडून करावयाच्या कामांची यादी विनाविलंब तयार करून त्याची निविदा प्रक्रिया त्वरित सुरू करावी. शक्यतोवर पुढील पावसाळ्यापूर्वी कामे वेगाने पूर्ण करावीत. रेल्वे रुळाखालील बंदिस्त मार्गाचे विस्तारीकरण करताना पारंपरिक पद्धतीने अथवा मायक्रो टनेलिंग करण्याबाबत स्थळपरत्वे निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरले.
या ठिकाणी तुंबले पाणी
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भांडुप स्थानक, विद्याविहार स्थानक, शीव-माटुंगा दरम्यानचा रेल्वे मार्ग, विक्रोळी-कांजुरमार्ग दरम्यानचा रेल्वे मार्ग, हार्बर रेल्वेचा शिवडी – वडाळा मार्ग, कुर्ला स्थानक, कुर्ला-मानखुर्द मार्ग, गुरू तेगबहादूर नगर-चुनाभट्टी, कुर्ला-टिळक नगर आदी ठिकाणांचा समावेश आहे.