आठ दिवसांत 25 लाखांची बेकायदा पार्किंग, आतापर्यंत 505 जणांना दणका

28

सामना प्रतिनिधी, मुंबई

बेकायदा पार्किंगविरोधात पालिकेने 7 जुलैपासून सुरू केलेल्या जोरदार कारवाईत आतापर्यंत तब्बल 25 लाख 79 हजार 630 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये एकूण 505 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पालिकेच्या वाहनतळापासून 500 मीटरच्या आत बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांकडून एक ते दहा हजार रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार 7 जुलैपासून पालिकेच्या 24 वॉर्डमध्ये जोरदार कारवाई सुरू आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या 23 ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक वाहनतळांलगतच्या 500 मीटर परिसरात कारवाई केली जात आहे. पालिकेच्या वाहतूक खात्याद्वारे याबाबत जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहेत.

अशी झाली कारवाई
दुचाकी -238
तीन चाकी -17
चार चाकी -250
एकूण – 505 वाहनांवर कारवाई
एकूण दंड वसूल- 25,79, 630 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या