पालिका रुग्णालयांत जन्मजात दोषांवर होणार तातडीने उपचार

21

सामना ऑनलाईन । मुंबई

जन्मजात दोष असणाऱ्या मुलांवर आता महापालिकेच्या रुग्णालयांमध्येच तातडीने उपचार केले जाणार आहेत. यासाठी पालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये ‘स्पेशल बर्थ डिफेक्ट क्लिनिक’ सुरू करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या ठरावाच्या सूचनेला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या उपक्रमामुळे गोरगरीबांना मोठा फायदा होणार आहे.

जन्मजात दोषांवर उपचार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. हा खर्च गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर असतो. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या तत्कालीन नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी महासभेत ठरावाची सूचना मांडली होती. महापालिकेच्या प्रमुख व इतर रुग्णालयांत प्रायोगिक तत्वावर स्पेशल बर्थ डिफेक्ट क्लिनिक सुरू करून अशा क्लिनिकमध्ये बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, न्यूरो सर्जन व इतर तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी व बालमृत्यूचे प्रमाण कमी करावे असे डॉ. पेडणेकर ठरावाच्या सूचनेत म्हटले होते.

याला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सकारात्मक प्रतिसाद कार्यवाही सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. सध्या फक्त केईएम क शीक येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात अशी सुविधा आहे. मात्र सर्व महत्त्वाच्या सर्व रुग्णालयांत ही सुविधा सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

अशा दोषांवर होणार उपचार
जन्मजात दोषांमध्ये नवजात अर्भकाची सर्वसाधारण काढ न होणे, मेंदूची वाढ न होणे, अर्भक गतिमंद असणे, हृदयात दोष, हाडांची वाढ न होणे आदी अनेक दोषांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या दोषांवर तत्काळ शस्त्रक्रिया, योग्य उपचार न झाल्यास मूल दगावण्याची शक्यता असते.

आपली प्रतिक्रिया द्या