पालिका घेणार ७० वॉकीटॉकी, सुरक्षेसाठी करणार वापर

54

सामना प्रतिनिधी । मुंबई

चोख सुरक्षा व्यवस्थेसाठी पालिकेने आपल्या सुरक्षा रक्षकांना वॉकीटॉकी देण्याचे ठरवले आहे. पोलिसांच्या हातात असणारे वॉकीटॉकी यापुढे पालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या हातात दिसणार आहेत. त्यामुळे रुग्णालये, धरण क्षेत्र, जलाशय अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मजबूत होणार असून आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा रक्षकांना समन्वय राखणे सुलभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षा रक्षक व कर्मचाऱयांना सूचनांची देवाणघेवाण करण्यासाठी सुमारे ७० वॉकीटॉकी महापालिका भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्यासाठी सुमारे ८० लाख २४ हजार ५९० रुपये खर्च करणार आहे. पालिकेने तसा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला आहे. मुंबई ही अतिरेक्यांच्या नेहमीच हिटलिस्टवर असते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. सुरक्षा खात्याने त्यानुसार सुरक्षा व्यवस्था चोख ठेवू, असे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानुसार हे वॉकीटॉकी घेतले जाणार आहेत. केईएम रुग्णालय, लोकमान्य टिळक रुग्णालय व नायर रुग्णालय आदी ठिकाणी मे. लिंकवेल टेलिकॉम सर्व्हिसेस यांच्याकडून भाडेतत्त्वावर वॉकीटॉकी घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

अनेकदा मोबाईल सीम कार्डला रेंज मिळत नाही. शिवाय मोबाईलद्वारे एकाच व्यक्तीशी संपर्क साधता येतो. त्यामुळे वॉकीटॉकी घेत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. तीन पाळीत काम करणाऱया सुरक्षा रक्षकांच्या काही ठरावीक कालावधीनंतर बदल्या होतात. त्यांच्याशी संपर्क साधण्यास वॉकीटॉकीमुळे सोपे जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या