पालिकेत नोकरी लावतो सांगून गंडवले

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओळखीने महानगरपालिकेत नोकरी मिळवून देतो अशी बतावणी करत बेरोजगार तरुण-तरुणींना गंडवणारा समीर पडेलकर याला पार्कसाईट पोलिसांनी गजाआड केले.पडेलकर हा पालिकेच्या परळ येथील पर्जन्य विभागात कामाला होता. बेरोजगारांना गंडा घालून तो फरार झाला होता.

31 वर्षीय समीर पडेलकर याने पालिकेत नोकरी लावण्यासाठी प्रफुल्ल नावाच्या तरुणाकडून 4 लाख 51 हजार रुपये घेतले होते.फसवणूक झाल्याचे समजताच प्रफुल्लने मार्च 2021 मध्ये पोलिसांत तक्रार दिली. तेव्हापासून समीर हा फरार होता आणि मोबाईल पह्न सतत बदलत असल्याने पोलिसांना त्याचा ठिकाणा लागत नव्हता. वरिष्ठ निरीक्षक विनायक मेर, निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मोहन जगदाळे तसेच सुतार, गायकवाड, नवले आणि गोसावी या पथकाने समीर याला शीव येथील एका हॉटेलात फिल्डिंग लावून पकडले.

मुंबई, कोकणातील अनेकांची फसवणूक

समीर याने पार्कसाईट, कांजुरमार्ग तसेच कोकणातील देवगड तालुक्यातील अनेकांना मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याची बतावणी करून आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तो बेरोजगारांना पालिकेच्या कार्यालयाजवळ बोलवून बाहेर उभा करायचा आणि अधिकाऱ्याला भेटून येतो असे सांगून त्यांची दिशाभूल करायचा.