हवाईमार्गे मुंबईत आल्यास क्वारंटाईन व्हावेच लागणार! पालिका प्रशासनाचे पुन्हा स्पष्टीकरण

1381

हवाईमार्गे मुंबईत आल्यास 14 दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावेच लागणार असल्याचे पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू (प्रकल्प) यांनी परिपत्रक काढले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, खबरदारी म्हणून पालिकेच्या माध्यमातून या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांत याच्या वडिलांनी पाटणा येथे रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्याचा तपास करण्यासाठी बिहारमधून मुंबईत हवाईमार्गे आलेल्या पोलीस अधिकार्‍याला पालिकेने गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या विश्रामगृहात क्वारेंटाईन केले होते. गुन्ह्याचा तपास करणार्‍या अधिकार्‍याला क्वारेंटाईन केल्यामुळे आणि आता क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर याबाबत माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर, पालिकेने हे स्पष्टीकरण दिले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, राज्य शासनाने 25 मे 2020 रोजीच्या आदेश क्रमांक डीएमयू/2020/सीआर 92/डीएसएम 1 अन्वये देशांतर्गत विमान प्रवास करणार्‍या व्यक्तींसाठी नियमावली ठरवली आहे. यामध्ये होम क्वारेंटाईनचादेखील समावेश आहे. या नियमानुसारच पाटणा पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना क्वारंटाइन करण्यात आले होते.

क्वारेंटाईन कालावधी कमी करण्यासाठी अर्ज आवश्यक
देशांतर्गत प्रवास करून मुंबईत येणार्‍या कोणत्याही सरकारी सेवेतील अधिकारी, कर्मचार्‍याला क्वारेंटाईनमध्ये सवलत हवी असल्यास त्याने मुंबईत पोहोचण्याच्या दोन दिवस आधी तसा अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जात मुंबईत येण्याचे कारण तसेच क्वारंटाईन कालावधी कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती दिली गेल्यास ही सुट मिळू शकते, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक हितासाठी नियम कठोर
मुंबईत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला असला तरी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करणार्‍या प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून 14 दिवस क्वारंटाईन करावेच लागत आहे. विमानतळांवर उतरल्यावर पालिका कर्मचार्‍यांकडून दोन्ही प्रकारच्या प्रवाशांची तपासणी केली जाते. त्यांना कोरोनाची लक्षणे नसल्यास 14 दिवसांसाठी होम क्वारेंटाईन केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसारच, मुंबई महानगरपालिका नियमांचे पालन करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या