कचरामुक्त शहराचे सर्वेक्षण चुकीचे; महापालिकेचे केंद्राला ‘नाराजी’ पत्र

628
bmc-2

केंद्र सरकारकडून ‘कचरामुक्त शहराचे चुकीचे सर्वेक्षण’ केल्यामुळेच मुंबईची स्वच्छता सर्वेक्षणात पिछेहाट झाल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केंद्राच्या हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स मिनिस्ट्रीला पत्र लिहिले असून ‘थर्ड पार्टीने’ केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याचे पुराव्यासह सांगितले आहे.

केंद्र सरकारकडून प्रत्येक वर्षी देशभरात सर्वेक्षण करून ‘स्वच्छ शहरा’चा दर्जा निश्चित केला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मुंबईच्या सर्वेक्षणात केंद्रीय समितीकडून मुंबईतील कचर्‍यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. गेल्या वर्षी मुंबईला 49 वे स्थान देण्यात आले होते. यानंतर गेल्या वर्षभरात पालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे कचर्‍याचे प्रमाणही घटले आहे. मात्र, यावर्षीदेखील 19 मे रोजी जाहीर केलेल्या सर्वेक्षणात मुंबईला ‘नापास’ ठरवण्यात आले आहे. मात्र, या सर्वेक्षणावरच पालिकेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रभाव असतानाही 25 हजार कर्मचारी शहर स्वच्छ राहण्याच्या कामावर अहोरात्र मेहनत घेत आहेत. दोन हजार किमींपेत्रा जास्त लांबीचे रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी काम केले जात आहे. असे असताना केंद्राकडून असा अहवाल देण्यात येत असेल तर स्वच्छतेसाठी झटणार्‍या कामगार-अधिकार्‍यांच्या मनावर विपरित परिणाम होणार असल्याचेही काकाणी यांनी निदर्शनास आणून दिले आहे. सद्यस्थितीत मुंबई शहर किमान थ्री-स्टार रेटिंगसाठी पात्र ठरू शकते. त्यामुळे जाहीर केलेल्या निकालांबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणीही काकाणी यांनी केली आहे.

पालिका काय म्हणते…

  • यावर्षीच्या सर्वेक्षणात मुंबईला शून्य रेटिंग देण्यात आले आहे. मात्र मुंबईला शून्य रेटिंग देताना थर्ड पार्टी एजन्सीने चुकीचे पुरावे दिल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केंद्राला पाठवलेल्या पत्रात म्हटले आाहे. एम पश्चिम येथील रस्ता अस्वच्छ असल्याचे छायाचित्र यासाठी जोडण्यात आले आहे.
  • या छायाचित्रावरच काकाणी यांनी आक्षेप नोंदवला आहे. हे छायाचित्र फोटोशॉपचा वापर करून जोडून बनवण्यात आल्याचे दिसत असल्याचेही काकाणी यांनी पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे संबंधित प्रत्यक्ष ठिकाण आणि सर्वेक्षण एजन्सीने दाखवलेले फोटो जुळत नाहीत.
आपली प्रतिक्रिया द्या