कीटकनाशक विभागाचा कोरोनाशी यशस्वी लढा! 51 पैकी 39 कोरोनामुक्त होऊन पुन्हा कामावर

510

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा काम करीत असताना कीटकनाशक विभागही प्रभावीपणे काम करीत आहे. कोरोनाचा धोका असताना तीन हजार 217 कर्मचारी सॅनिटायझेशनसोबत डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी फवारणी, डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे हे काम करीत असताना कोरोनाची लागण झालेले 51 पैकी 39 कामगार कोरोनामुक्त होऊन पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. यामध्ये पालिकेचे प्रमुख कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांचाही समावेश आहे.

मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्यानंतर आतापर्यंत तीन महिने कीटकनाशक विभाग सॅनिटायझेशनच्या कामाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, खासगी-शासकीय इमारती, आस्थापने, कार्यालये, झोपडपट्टय़ांसह अनेक ठिकाणी काम करावे लागत आहे. मात्र हे काम करीत असताना 51 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र पालिकेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रभावी क्वारंटाइन करून आवश्यक उपचार आणि खबरदारी घेतल्यामुळे 39 कामगार कोरोनामुक्त होऊन पुन्हा कामावर हजर झाले आहेत. तर इतर कामगारांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली असल्याने तेदेखील कोरोनामुक्त होणार आहेत. कीटकनाशक विभागातील दोन कर्मचाऱ्यांचा मात्र कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित असतानाही प्रमुख अधिकाऱ्याचे अखंड काम
पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी घाबरून न जाता योग्य औषधोपचार, आवश्यक खबरदारी आणि आत्मविश्वासाने कोरोनावर मात केली. विशेष म्हणजे, क्वारंटाइन असताना एकही दिवस त्यांनी आपल्या सेवेत खंड पडू दिला नाही. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देणे, दररोजच्या कामाचा आढावा घेणे, नियोजन करणे, कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे अशा सर्व जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. विशेष म्हणजे, कोरोनामुक्त होऊन पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजरही झाले.

आपली प्रतिक्रिया द्या