कुर्ला दुर्घटना – मृतांच्या नातेवाईकांना भरपाई, वारसांना नोकरी द्या!

कुर्ला येथे सोमवारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम करताना विजेचा शॉक लागून दोघा पालिका कर्मचाऱयांचा मृत्यू झाला. या कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांना पालिकेने तातडीने नुकसानभरपाई द्यावी तसेच त्यांच्या वारसांना पालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे.

कुर्ला पश्चिममधील सुमननगर येथे सोमवारी दुपारी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना पालिकेच्या सात कर्मचाऱयांना विजेचा शॉक लागला. त्यात गणेश उगले आणि अमोल काळे या कर्मचाऱयांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. जखमींना त्याच दिवशी उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. दरम्यान, या दोघा कर्मचाऱयांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाल्यामुळे महापालिका सेवा नियमावली आणि प्रचलित कामगार कायद्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई तसेच दोन्ही कामगारांच्या वारसांना तातडीने अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार पालिकेत कायम नोकरी द्यावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या