मुंबई महापालिकेत सोमवारपासून पुन्हा बायोमेट्रिक हजेरी; 100 टक्के उपस्थिती बंधनकारक

767
bmc-2

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन मार्च महिन्यापासून बंद करण्यात आलेली मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी सोमवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याबरोबरच कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थितीही बंधनकारक करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे परिपत्रक बुधवारी काढले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीच्या काळात उपस्थितीबाबत काही सवलती दिल्या होत्या. यात पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बायोमेट्रिक हजेरी बंद करून रजिस्टरवर हजेरी घेण्यात येऊ लागली. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या दोन महिन्यांनंतर अत्यावश्यक सेवेतील 50 टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक केले तर 8 जूनपासून 75 टक्के उपस्थिती लागू केली होती. मात्र, आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी 100 टक्के उपस्थिती लावण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत तर 6 जुलैपासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.

सॅनिटायझर लावून हजेरी
कोरोनोचा संसर्ग टाळण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी नोंदवण्यापूर्वी आणि नोंदवल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हातांना सॅनिटायझर लावावे, अशा सूचना पालिकेने केल्या आहे. प्रत्येक यंत्राच्या बाजूला सॅनिटायझर ठेवण्याच्या सूचना खातेप्रमुखांना दिल्या आहेत. हजेरी नोंदवण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून कार्यालयीन वेळेपासून 60 मिनिटे विलंबाने आणि वेळ संपण्याच्या 60 मिनिटे आधी उपस्थिती नोंदवण्याची मुभा देण्यात आली आहे.

बायोमेट्रिक हजेरीला कर्मचारी संघटनांचा विरोध
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांची हजेरी सध्या रजिस्टरवरच घ्यावी. परिस्थिती निवळल्यावर किंवा पावसाळा संपल्यानंतर बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याचा विचार करावा, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियन आणि बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनने पालिकेकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या