मुंबईत स्वच्छतेत वरळी नंबर वन!

588

मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पालिकेच्या वरळी विभागाने बाजी मारली असून मुंबईतील सर्वात स्वच्छ वॉर्ड म्हणून मान मिळवला आहे तर वरळीतीलच डॉ. बी. एच. खरुडे मनपा मंडईने सर्वात स्वच्छ मंडईचा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे वरळीने स्वच्छतेत दुहेरी मुकुट मिळवला आहे. पालिका वॉर्ड, शाळा, हॉटेल, मंडई, रुग्णालये इत्यादी 11 गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

मुंबईतील वरळीसह राज्य कचरामुक्त, खड्डेमुक्त आणि रोगमुक्त करण्याचा संकल्प शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्या दिशेने वरळी विभागाची वाटचाल सुरू असून स्वच्छतेबाबतची जिंकलेली ही दुहेरी लढाई त्याची पहिली पायरी मानली जात आहे. वरळीतील ‘एनएससीआय’मध्ये नुकतेच स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचे वितरण आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे समन्वयक किरण दिघावकर यांच्यासह पालिका तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळीचा (जी-दक्षिण) सर्वाधिक स्वच्छतेचा पुरस्कार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्वीकारला.

मुंबईच्या प्रथम नागरिक आणि वरळी विभागातील नगरसेवक म्हणून याचा मला खूप आनंद झाला आहे. वरळीला हा बहुमान मिळण्याचे सर्व श्रेsय हे जी-दक्षिण वॉर्डच्या सर्व कर्मचारी आणि वॉर्ड ऑफिसरचे आहे. स्वच्छतेचे काम हे केवळ 8 तासांचे काम आहे असे न मानता वरळीचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने मनापासून झटून काम केले. त्याच्याबरोबरच प्रत्येक वरळीकरांचेही मी मनापासून आभार मानते. त्यांच्या सहकार्यामुळेच हा बहुमान वरळीला मिळाला आहे. – किशोरी पेडणेकर, महापौर

  • स्वच्छ गृहनिर्माण संस्था – फ्रॅन्जीपानी सहकारी गृहनिर्माण संस्था, कुर्ला
  • स्वच्छ हॉटेल – रेनसान्स मुंबई कन्व्हेन्सन सेंटर, भांडुप
  • स्वच्छ सार्वजनिक रुग्णालय – सेंट जॉर्जेस समूह रुग्णालय, फोर्ट
  • स्वच्छ खासगी रुग्णालय – पी. डी. हिंदुजा, माहीम
  • स्वच्छ पालिका शाळा – आयईएस हर्णे गुरुजी विद्यालय, सांताक्रुझ
  • स्वच्छ खासगी शाळा – विट्टी इंटरनॅशनल शाळा, गोरेगाव
  • सर्वोत्कृष्ट स्वयंसेवी संस्था – माऊली मिराई महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था, दहिसर
  • स्वच्छ सामुदायिक शौचालय-सार्वजनिक शौचालय – प्रथा सामाजिक संस्था, घाटकोपर
आपली प्रतिक्रिया द्या