पालिका प्रशासनाने घेतला धसका

16

सामना ऑनलाईन । मुंबई

रस्त्यावर कचरा होऊ नये म्हणून जागोजागी लावलेल्या स्टीलच्या कचराकुंड्याही चोरून नेण्याचे, त्याची मोडतोड झाल्याचे प्रकार घडल्यामुळे पालिका प्रशासनाने धसका घेतला आहे. यापुढे कचराकुंडीची जबाबदारी घेणाऱया सोसायट्यांच्या जवळ किंवा नगरसेवकांनी सांगितलेल्या ठिकाणीच कचराकुंड्यां बसवण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. पालिका नव्याने दीड हजार नवे कचऱ्याचे डबे विकत घेणार आहे.

मुंबईचे रस्ते कचरामुक्त करण्यासाठी पालिकेने सन २०१३ मध्ये गोलाकार पोलयुक्त कचराकुंडय़ा खरेदी केल्या होत्या. अशा ४९८० कुंड्या मुंबईत विविध ठिकाणी बसवण्यात आल्या होत्या. मात्र या कचराकुंड्यांपैकी बहुतांशी ठिकाणी कचराकुंड्यांच चोरून नेल्या आहेत तर काही ठिकाणी नासधूस केल्या आहेत असे आढळून आल्यामुळे घनकचरा विभागाने आणखी १५५० कुंड्यां विकत घेऊन बसवण्याचे ठरवले आहे. प्रत्येक डब्यासाठी आठ हजार ९९९ रुपये याप्रमाणे एक कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च पालिका करणार असून तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

इथे बसवणार कचराकुंड्यां
यापूर्वी घेण्यात आलेल्या कचराकुंड्यां बसस्थानके, रेल्वेस्थानके, महाविद्यालये, शॉपिंग मॉल्स, मंडई, पर्यटनस्थळे, रस्त्याच्या दुतर्फा अशा ठिकाणी बसवण्यात आल्या होत्या, मात्र यावेळी पालिका कार्यालये, पालिका उद्याने, महाविद्यालये व रुग्णालये अशा ठिकाणी जेथे सुरक्षारक्षक तैनात असतात अशा ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था अथवा दुकानदारांच्या संघटना अशा कचराकुंडय़ांचे पालकत्व घेण्यास तयार असतील अशा सहकारी गृहनिर्माण सोसायटय़ा व त्यांच्या प्रगत व्यवस्थापन व अन्य संघटनांनी मागणी केल्यास तेथील सार्वजनिक रस्त्यांवर या कचराकुंड्यां बसवण्यात येतील.

आपली प्रतिक्रिया द्या