महापालिकेत साडेपाच हजार ‘आशा’ सेविकांची जम्बो भरती, घरोघरी जाऊन आरोग्य जनजागृती करणार

मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन आरोग्याची विचारपूस करून गरजूंना आवश्यक उपचार-सुविधांबाबत मार्गदर्शन करणे, आरोग्याबाबत जनजागृती करणे यासाठी पालिका 5 हजार 575 ‘आशा’ सेविकांची भरती करणार आहे. पंत्राटी तत्त्वावर होणाऱया या भरतीसाठी महानगरपालिकेने अर्ज मागविले आहेत. या ‘आशा’ सेविकांना दरमहा सहा हजार रुपये आणि कामावर आधारित मानधन देण्यात येणार आहे.

मुंबईकरांना घराजवळ व सहजपणे आरोग्य सेवा मिळावी म्हणून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तर आता वस्ती पातळीवर गृहभेटी देऊन आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी ही आशा सेविकांची भरती करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

– आरोग्य केंद्रात 1 हजार ते 1200 लोकसंख्येसाठी व अंदाजे 250 घरांसाठी एक अशा पद्धतीने आशा स्वयंसेविकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

31 मार्चपर्यंत अर्ज करा

आशा स्वयंसेविका महिलांची वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे या दरम्यान असावी. इच्छुक महिला उमेदवार साक्षर व किमान 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले असावे. त्यांच्याकडे नेतृत्वगुण आणि समुदायाशी संवाद साधण्याचे काwशल्य असावे. शक्यतो संबंधित विभागातील जवळ निवासस्थान असावे. अर्ज पालिकेच्या ए ते टी विभाग कार्यालयांमध्ये स्वीकारण्यात येतील. अर्जाचा नमुना विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) यांचेकडे मिळू शकेल. 31 मार्चपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.