बारा हजार ‘पिचकारी’ बहाद्दरांना पालिकेचा दणका, 24 लाख 89 हजारांचा दंड वसूल

कोरोनाचा धोका असतानाही अनेक बेजबाबदार नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेकडून धडक कारवाई करताना 12 हजार जणांवर कारवाई करून प्रत्येकी 200 रुपये दंड याप्रमाणे 24 लाख 89 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आगामी काळात ही कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यांसारख्या विविध रोगांचा प्रसार होत असल्याने पालिकेद्वारे दंडात्मक कारवाई नियमितपणे करण्यात येते. यानुसार गेल्या सुमारे 6 महिन्यांत 12 हजारांपेक्षा अधिक व्यक्तींकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल तब्बल रुपये 24 लाख 89 हजार 100 इतकी दंडवसुली करण्यात आली आहे.

याबाबत एका जनहित याचिकेच्या प्रकरणी उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहे. तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाइज करावेत आणि दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

विभागवार झालेली मोठी कारवाई
ए विभाग – रुपये 3,29,800/-
बी विभाग – रुपये 1,31,000/-
एफ दक्षिण विभाग – रुपये 2,17,400/-
एच पूर्व विभाग – रुपये 1,71,400/-
पी उत्तर विभाग – रुपये 1,79,200/-

आपली प्रतिक्रिया द्या