पूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार, अतिधोकादायक आढळल्यामुळे निर्णय

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईच्या पूर्व उपनगरातील सहा पूल पालिका नव्याने बांधणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हे पूल अतिधोकादायक आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये घाटकोपर, मुलुंड आणि विक्रोळीतील पुलांचा समावेश आहे. या कामासाठी 7 कोटी 79 लाख 14 हजार 989 रुपये खर्च करण्यात येणार आहे. मार्च 2018 मध्ये हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हिमालय पूल दुर्घटनेत सहा जणांना जीव गमवावा लागल्यानंतर पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. यामध्ये अतिधोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत तर अहवालानुसार दुरुस्ती सुचवलेल्या पुलांचे काम सुरू आहे. यानुसार पूर्व उपनगरातील सहा पूल पाडून तेथे नव्याने पूल बांधले जाणार आहेत. या कामासाठी मे. स्ट्रक्टकेल डिझाईन्स अँड कन्सल्टंटस् प्रा. लि. या कंपनीची सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर ए. पी. आय. सिव्हिलकॉन प्रा. लि. या कंपनीला नव्याने पूल बांधण्याचे कंत्राट देण्यात येणार आहे. पावसाळा वगळून 18 महिन्यांत पूल बांधण्याचे काम पूर्ण करण्यात येईल.

हे पूल पाडून नव्याने बांधणार
घाटकोपर पश्चिम बर्वेनगर येथील संत मुक्ताबाई रुग्णालयाजवळील पादचारी पूल.
विक्रोळी येथील कन्नमवार नगर, पँथर नगर मातृछाया चाळीजवळील पादचारी पूल.
पवई रेनेसन्स हॉटेल येथील पादचारी पूल.
मुलुंड येथील रमाबाई नगर, पादचारी पूल.
विक्रोळी पूर्व, टागोर नगर, बिंदुमाधव ठाकरे मार्ग आणि दत्त साई रोडजवळील ट्रान्समिशन नाल्यावरील पूल.
पवई साकी विहार रोड येथील पूल.

आपली प्रतिक्रिया द्या