बालकांना टायफॉईडची मोफत लस, महापालिकेचे एक पाऊल पुढे

143

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील बालकांना टायफॉईड या आजाराची लस मोफत देण्याचे महापालिकेने ठरवले आहे. दोन वर्षे आणि पाच वर्षे पूर्ण केलेल्या बालकांना ही लस देण्यासाठी पालिकेने दीड कोटीची तरतूद केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या विस्तारित लस टोचणी कार्यक्रमात या लसीचा समावेश नसल्यामुळे राज्य सरकार टायफॉईडवरील लसीचा पालिकेला पुरवठा करीत नाही. त्यामुळे पालिकेने या लसींची खरेदी करण्याचे ठरवले आहे. मुंबईतील साडेतीन लाख मुलांना त्याचा फायदा होणार आहे.

जागतिक लस टोचणी कार्यक्रमांतर्गत पोलिओ, घटसर्प, डांग्याखोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर व हेपॅटायटिस बी या रोगांपासून रक्षण करण्यासाठी पाच वर्षांच्या आतील मुलांसाठी प्रतिबंधात्मक लस टोचणी कार्यक्रम मोफत राबवला जातो. मात्र आतापर्यंत टायफॉईड अर्थात विषमज्वर या आजाराची लस मोफत दिली जात नव्हती. ही लस बाजारात उपलब्ध असून ती खासगी रुग्णालयात शुल्क आकारून दिली जाते. मात्र राष्ट्रीय अनुसूचित ही लस समाविष्ट नसल्यामुळे पालिका रुग्णालयात ही लस देण्यात येत नव्हती. त्यामुळे गरीब घरातील मुलांना ही लस घेता येत नव्हती. पालिकेतर्फे ही लस मोफत देण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेविका समिती कांबळे यांनी सन २०१५ मध्ये केली होती. या मागणीला प्रशासनाने आता मंजुरी दिली आहे.

या आर्थिक वर्षापासून सुरुवात
पालिकेच्या विस्तारित लस टोचणी कार्यक्रमात विषमज्वर या लसीचा समावेश करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत पाच व दोन वर्षे पूर्ण झालेल्या बालकांना ही लस २०१७-१८ या आर्थिक वर्षात मोफत देण्यात येणार आहे. त्याकरिता अर्थसंकल्पात दीड कोटीची तरतूद करण्यात आली आहे. या लसीच्या खरेदीसाठी मध्यवर्ती खरेदी खात्याअंतर्गत कार्यवाही सुरू झाली आहे.

  • टायफॉईड या रोगाच्या प्रतिबंधाकरिता ‘व्ही आय पॉलिसॅकराइड’ ही लस उपलब्ध आहे.
  • या लसीची केवळ ६० ते ८० टक्केच खात्री असते. सर्व मुलांना ही लस दिल्यानंतरही ३० टक्के मुलांना या आजाराची लागण होऊ शकते.
  • या लसीमुळे दोन ते तीन वर्षे संरक्षण मिळते.
  • ५ ते १९ वयोगटातील मुलांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आढळते.
  • ही लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी सूज, दुखणे, ताप, डोकेदुखी, उलट्या, जुलाब व अंगावर पुरळ येतात.
    आकडेवारी
  • या लसीची किंमत प्रतिडोस १०० रुपये इतकी आहे.
  • मुंबईतील दोन व पाच वर्षे पूर्ण केलेल्या बालकांची संख्या २०१६ मध्ये सुमारे ३.५० लाख होती.
  • यामुळे पालिकेला साडेतीन कोटी प्रतिवर्षी खर्च करावे लागणार आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या