विठ्ठल-रखुमाईची आरती, गणपतीदर्शन, अमेरिकेत मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर

34

 सामना प्रतिनिधी । डलास

अमेरिकेत गेल्या अनेक वर्षांपासून मर्‍हाटमोळ्या संस्कृतीचा जागर सुरू आहे. यंदाही अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. दर दोन वर्षांनी हे अधिवेशन भरते. अमेरिकेतल्या विविध राज्यांत गेली 18 अधिवेशने आतापर्यंत पार पडली. यंदाचे अधिवेशन टेक्सासमधल्या डलासमध्ये 11 ते 14 जुलैदरम्यान भरवण्यात आले आहे. साहित्य-संस्कृती-विज्ञान-व्यवसाय असा खजिनाच या अधिवेशनात उलगडण्यात आला.

एका भव्य कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे अधिवेशन भरवण्यात आले असून प्रवेशद्वारावर गणपतीचे दर्शन होईल. सगळीकडे पताकांची सजावट असेल. मुख्य सभागृहात विठ्ठल-रखुमाई मंदिर उभारण्यात आले असून येथे आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल- रखुमाईची आरतीही करण्यात आली. अधिवेशनात रोज मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. गायिका आर्या आंबेकर, अभिनेत्री स्पृहा जोशी, ऋषिकेश रानडे, विशाखा सुभेदार अशा मंडळींनी आपली कला सादर केली. सामाजिक कार्य करणार्‍या आणि अमेरिकेतील तसेच महाराष्ट्रातील मराठी समाजाचे प्रश्न घेऊन त्यावर काही उपक्रम सुरू करण्याच्या हेतूने एनजीए समिट ही संकल्पनाही अधिवेशनात प्रथमच प्रत्यक्षात आणण्यात आली. यात पाणी फाऊंडेशन, मराठी विज्ञान परिषद आणि हॅलो मेडिकल फाऊंडेशन अशा स्वयंसेवी संस्था सहभागी होत आहेत. एनजीओ समिटचे प्रमुख पाहुणे ‘पद्मभूषण’ प्रा. ज्येष्ठराज जोशी असून समिटमध्ये डॉ. माने, डॉ. शशिकांत अहंकारी, अ. पां. देशपांडे या मान्यवरांचा समावेशही या कार्यक्रमात आहे. ज्या गावात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जे. एफ. केनेडी यांची हत्या झाली त्याच डलासमध्ये हे अधिवेशन होत असून अधिवेशनानिमित्त ते पाहण्याची संधी मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या