दहावी–बारावीच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर, शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू

80

सामना ऑनलाईन । मुंबई

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी दहावीची परीक्षा सुरू असताना दुसरीकडे दहावी आणि बारावीच्या तब्बल ४०० ते ५०० उत्तरपत्रिका रस्त्यावर सापडल्याने पालकवर्गासह शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. अतिशय कडक बंदोबस्तात एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर नेण्यात येणाऱया या उत्तरपत्रिका रस्त्यावर सापडल्याच कशा ? यामागचे नेमके गौडबंगाल काय? त्यांचा गैरवापर तर झाला नसेल ना? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरितच आहेत. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शिक्षण विभागाने आपल्या स्तरावर कसून चौकशी सुरू केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दहावीची परीक्षा सुरू असून या परीक्षांमुळे पालकवर्गही प्रचंड तणावाखाली आहे. हा तणाव असतानाच दुसरीकडे विक्रोळी ते घाटकोपरदरम्यान पूर्व दूतगती महामार्गावर दहावीच्या कोऱया उत्तरपत्रिका सापडल्याने पालकवर्गात आणि शिक्षण विभागातही प्रचंड खळबळ उडाली आहे.

तीन ते चार दिवसांत प्रकरण उजेडात आणणार
या घटनेप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे मुश्ताक महमद शेख यांनी दिली. पोलिसांनी या उत्तरपत्रिकांचा पंचनामा केल्यानंतर त्या आपल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या उत्तरपत्रिकांवरील क्रमांकांवरून त्या नेमक्या कोणत्या केंद्राच्या आहेत आणि त्या महामार्गावर कशा आल्या? याबाबतचा खुलासा होऊ शकेल असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या वर्षी पहिल्याच पानावर बारकोड होता. या वर्षीच्या उत्तरपत्रिकांमध्ये प्रत्येक पानावर बारकोड आहे. त्यामुळे गैरवापर होण्याची शक्यता तशी कमीच आहे. तरीही गैरवापर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असेही शेख यांनी सांगितले.

कुठल्या स्थितीत आढळल्या उत्तरपत्रिका
उत्तरपत्रिका रस्त्यावर इतरत्र विखुरलेल्या अवस्थेत सापडल्या. उत्तरपत्रिकांवर बारकोड चिकटवताना किंवा क्रमांक लिहिताना काही चुकले तर विद्यार्थ्याना उत्तरपत्रिका बदलून दिल्या जातात. चुकीच्या उत्तरपत्रिका तशाच परत घेतल्या जातात. अशा वापरात न आलेल्या १५ ते १६ उत्तरपत्रिका त्यात होत्या. सर्व उत्तरपत्रिकांचे वजन अंदाजे १६ किलो भरल्याचे शेख यांनी सांगितले. या सर्व २०१७ च्या दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका असून या उत्तरपत्रिकांचा गैरवापर झाला की नाही याबाबत चौकशीनंतरच निश्चित माहिती मिळू शकेल, असे शिक्षण निरीक्षक मुश्ताक महम्मद शेख यांनी सांगितले.

दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका अशा प्रकारे रस्त्यावर सापडणे हा शिक्षण विभागाचा निष्काळजीपणा आहे. विशेष म्हणजे या सर्व उत्तरपत्रिका कोऱया असल्याने त्यांचा गैरवापर झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही. याप्रकरणाची कसून चौकशी झालीच पाहिजे.
-प्रशांत रेडीज, (सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना)

आपली प्रतिक्रिया द्या