शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीशी पालिका कायम राहणार

33

महापौरांचे संघटनेला आश्वासन

शिवाजी पार्क

मुंबई महानगरपालिका नेहमीच शरीरसौष्ठव आणि शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे आणि भविष्यातही राहील. मुंबईचे नाव देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणाऱ्या गुणवान खेळाडूंच्या कर्तृत्वाची कदरही पालिका निश्चित घेईल, असे आश्वासनही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले. येत्या 22 एप्रिलला होणाऱया प्रतिष्ठानच्या ‘मुंबई महापौर श्री’ स्पर्धेच्या भव्यदिव्य आयोजनासाठी महापौरांनी बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेला भरभरून शुभेच्छाही दिल्या.

शरीरसौष्ठवाच्या लौकिकाला साजेशी अशी जिल्हास्तरीय स्पर्धा 22 एप्रिलला लोअर परळ येथील ललित कला भवनात रंगणार आहे. आमदार सुनील शिंदे आणि शिवबा प्रतिष्ठानच्या सहकार्याने होत असलेल्या ‘मुंबई महापौर श्री’ स्पर्धेच्या तयारीनिमित्ताने शरीरसौष्ठव संघटनेच्या पदाधिकाऱयांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेतली. महापौरांनी मोठय़ा आस्थेने या प्रतिष्ठत स्पधेच्या तयारीविषयी माहिती जाणून घेतली. या ग्लॅमरस खेळाला अपेक्षेपेक्षा कमी निधी मिळत असला तरी संघटना स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही उणीव भासू देत नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष अजय (नंदू) खानविलकर यांनी सांगितले. महापौरांनीही याची दखल घेत शरीरसौष्ठवावर मुंबई पालिकेचे प्रेम असेच कायम राहील आणि भविष्यात स्पर्धा आयोजनात निधीची वाढ केली जाईल असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे खेळाडूंच्या नोकरीचा प्रश्न सोडविण्यासाठीही जातीने लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेला मुंबईचे पीळदार ग्लॅमर शेकडोंच्या संख्येने आवर्जून मंचावर दिसेल असा विश्वास संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी व्यक्त केला. याप्रसंगी संघटनेचे विजय झगडे आणि शंकर कांबळीही उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या