बनावट आधार, रेशन आणि इलेक्शन कार्ड देणारे रॅकेट उद्ध्वस्त

30

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शासकीय विभागात सक्तीचे करण्यात आलेले आधार, रेशन आणि इलेक्शन कार्ड तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या टी.व्ही. सेंटर येथील दुकानात सुरू असलेला छापखाना गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला. दुकानातून पोलिसांनी तीन संगणक, तीन प्रिंटर, तीन लॅपटॉप, दोन स्कॅनर, एक लॅमिनेशन मशीनसह कागदी बंडल असा एकूण लाखो रुपयांचा ऐवज जप्त करीत तीन जणांना अटक केली. काही महिन्यांपासून हा गोरखधंदा सुरू होता. या बनावट कागदपत्रांआधारे ज्यांनी लाभ घेतला, त्यांनाही आरोपी करण्यात येणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडको, टी.व्ही. सेंटर येथील न्यू आधार मल्टी सर्व्हीसेस या दुकानात बनावट आधार, रेशन आणि इलेक्शन कार्ड तयार करून विक्री केले जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक धनश्याम सोनवणे, सुभाष शेवाळे, सुधाकर राठोड, विजयानंद गवळी, सय्यद अशरफ, लालखाँ पठाण, योगेश गुप्ता, सिद्धार्थ थोरात आणि नंदलाल चव्हाण यांच्या पथकाने आज गुरुवारी दुपारी दुकानावर छापा मारून मालक सय्यद हमीद सय्यद हबीब, शेख हबीब शेख हनिफ, पूनमचंद दिगंबरसा गणोरकर या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दुकानाची तपासणी केली असता दुकानात बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड आणि निवडणूक कार्ड तयार करीत असल्याचे दिसून आले. संगणकाद्वारे कार्ड तयार करून त्याचे लॅमिनेशन करून विक्री करीत असल्याचे उघड झाले.

गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दुकानातून ९० बनावट रेशन कार्ड जप्त केले असून, त्यात ६७ पिवळे रेशन कार्ड आढळून आले. यात २७ आधार आणि ४ इलेक्शन कार्डचा समावेश आहे. यापाठोपाठ दुकानातून पुरवठा अधिकाऱ्याच्या सहीचे बनावट रबर स्टॅम्पसह तीन संगणक, तीन लॅपटॉप, ४ प्रिंटर, दोन स्कॅनर, एक लॅमिनेशन मशीन असा लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाभार्थींचा शोध घेणार
न्यू आधार सर्व्हीसेस या दुकानातून ज्या ग्राहकाने सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी बनावट आधार, रेशन कार्ड तयार केले, त्यांच्या यादीचे रजिस्टर पोलिसांनी जप्त केले आहे. रजिस्टरमध्ये नमूद असलेल्या ग्राहकाने कोणत्या सरकारी खात्यात कार्डचा वापर करून फायदा घेतला असल्यास त्यालाही यात आरोपी करण्यात येणार असल्याचे शिवाजी कांबळे यांनी सांगितले. या रॅकेटमध्ये पुरवठा विभागातील तसेच शहरातील नामांकित रुग्णालयाचे काही कर्मचारीही अडकणार असल्याचे संकेतही कांबळे यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या