जालन्यात बनावट बियाणे तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त

सामना प्रतिनिधी । जालना

जालना येथे ६४ लाख ४२ हजार रुपयांची बनावट बियाणे व बियाण्यांवर प्रक्रिया करण्याची उपकरणे जप्त करून स्थानिक गुन्हे शाखा व कृषी विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करून बनावट बियाणे तयार करण्याचा कारखानाच उद्ध्वस्त केला आहे.

कृषी विभागाने बदनापूर व भोकरदन तालुक्यात बनावट गिऱ्हाईक पाठवून बोगस बियाणे विक्री कोठे चालू आहे, याची माहीती घेतली. त्यानुसार जालना शहरातील कचेरी रोड येथील कल्पेश शांतीलाल टापर याने स्वतःच्या घरी बनावट आर.आर.बी.टी. कापूस बियाणांची पॅकींग करुन बेकायदेशिररित्या त्याची विक्री केली असून विक्रीसाठी साठा केला आहे, अशी माहीती मिळाली. कृषी अधिकारी सयाप्पा दगडू गरंडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रा. खते, बियाणे, किटकनाशके व्दारा कार्यालय जालना अधिक्षक कृषी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि दोन शासकीय पंचासह कल्पेश शांतीलाल टापर यांच्या घरी छापा मारला असता आर.आर.बी.टी. कपाशीचे पँकिग व खुले बियाणे, भेंडी, मिरची, टरबुज, भोपळा, वांगे, कांद्याचे बनावट पँकिग व प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये भरलेले बियाणे सापडले. बनावट बियाणांना रासायनिक प्रक्रिया व रंग देवून नामांकीत कंपनीचे बनावट लेबल वापरून खरे वाटतील असे बियाणे तयार करण्यात आले होते. पोलिसांनी ६४ लाख ४२ हजार रुपयांची बनावट बियाणे व बियाण्यांवर प्रक्रिया करण्याची उपकरणे जप्त केली.

सदरची कारवाई ही राज्यातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी आरोपीवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक्षक रामनाथ पोकळे यांच्या आदेशाने स्थानिग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हनुमंत वारे हे तपास करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा कृषी अधिकारी डी.एल. तांभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सयाणा गरंडे, हनुमंत वारे, कमलाकर अंभोरे, सुरेश गिते, भालचंद्र गिरी, तुकाराम राठोड, सॅम्युअल कांबळे, फुलसिंग घुसिंगे, हिरामण फलटणकर, सदाशिव राठोड, समाधान तेलंग्रे, मदन बहुरे, रंजित वैराळ आदींनी संयुक्तरीत्या पार पाडली.