अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी आउटसाइडर असल्याची व्यक्त केली खंत, म्हणाले…

कॉमेडी ते गँगस्टर अशा विविधांगी भूमिकांमुळे अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी एक आपला खास प्रेक्षकवर्ग बनवला आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सुल्ताने ते ‘मिर्झापूर’मधील कालीन भैय्या अशा विविध भूमिका त्यांनी ताकदीने उभ्या केल्या.

गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये पंकज त्रिपाठी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले असले तरी त्यांचा संघर्ष त्याआधीपासून सुरू होता. सुरुवातीला एक-दोन मिनिटांचा रोलही नशिबाने मिळणाऱ्या पंकज त्रिपाठी यांनी आपल्या कलेच्या जोरावर मोठा पडदा गाजवला. मात्र सहज, सुंदर आणि प्रेक्षकांच्या मनाला भावणारा अभिनय करणारे पंकज त्रिपाठी एक आउटसाइडर असल्याचे दु:ख जाणतात. याबाबत त्यांनी बोलूनही दाखवले आहे.

पंकज त्रिपाठी यांनी मोठ्या पडद्यावर कॉमेडी भूमिकाही साकारल्या आहेत. ‘फुकरे’ आणि ‘स्त्री’ या चित्रपटांमधून त्यांनी साकारलेल्या कॉमेडी भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच आवडल्या. तसेच ‘गुंजन सक्‍सेना: द कारगिल गर्ल’ ते ‘मसान’मध्ये त्यांनी केलेली भूमिकाही चाहत्यांना केली. मात्र एका आउडसाइडरला यशस्वी होणे इंडस्ट्रीमध्ये खूप आव्हानात्मक आहे, असे पंकज त्रिपाठी म्हणतात.

‘हे खरे आहे की इंडस्ट्रीमध्ये नवीन कलाकारांसाठी संघर्ष पाचवीचा पुजलेला आहे. इंडस्ट्रीमध्ये तुमचे काही कॉन्टॅक्ट असतील किंवा कोणी गॉडफादर असेल तर गोष्ट वेगळी आहे. परंतु एका आउटसाइडरचा इंडस्ट्रीतील प्रवास काट्यावर चालण्यासारखाच आहे. त्यात तुम्ही जर गावावरून आलेले असाल आणि हिंदी मीडियममध्ये शिक्षण घेतले असेल, तर तुमचा टिकाव लागणे खूपच अवघड असते’, असे पंकज त्रिपाठी यांनी म्हटले.

पंकज त्रिपाठी हे मूळचे बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील रहिवासी आहेत. एका शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते पटणाला आले. येथे त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली आणि हॉटेलमध्ये काम सुरू केले. मात्र त्यांच्यातील कलाकार त्यांना शांत बसू देत नव्हता. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथेच कलेचे धडे त्यांनी गिरवले.

आपली प्रतिक्रिया द्या