सोनू सूदची बहीण काँग्रेसकडून निवडणूक लढवणार?

अभिनेता सोनू सूद याची बहीण मालविका ही सक्रीय राजकारणात उतरली असून ती पुढच्या वर्षी पंजाबमध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. राजकारणात उतरत असल्याची घोषणा करण्यासाठी मालविका हिने एक पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेला सोनू सूद देखील उपस्थित होता. मालविकाने मोगा मतदारसंघातून प्रचाराला सुरुवातही केली आहे.

मालविकाने बोलावलेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील नेते हजर होते. यावरून तर्क लढवला जातोय की मालविका ही काँग्रेसकडून निवडणूक लढवेल. मालविकाने सोमवारी सोनू सूद आणि काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष बाबू सिंग यांच्यासोबत 10 गावांचा दौरा केला. मालविका ही 39 वर्षांची असून ती निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा तिचा भाऊ सोनू सूद यानेच केली. मालविका आणि सोनू सूद यांच्या या पत्रकार परिषदेमुळे मोगाचे विद्यमान आमदार हरजोत कमल यांना घाम फुटलाय. कमल हे काँग्रेसचे आमदार असून मालविका हिला काँग्रेसने पक्षात घेतलं आणि निवडणुकीचं तिकीट दिलं तर कमल यांचा पत्ता कट होणार आहे.

मोगा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आमदार हरजोत कमल यांनी त्यांची पत्नी राजिंदर कौर यांना उतरवलं होतं. मात्र त्या ही निवडणूक हरल्या होत्या. महापौरपदासाठीच्या निवडणुकीत राजिंदर कौर यांना शिरोमणी अकाली दलच्या हरविंदर कौर गिल यांनी पराभूत केलं होतं. याशिवाय या निवडणुकीत काँग्रेसला 50 पैकी 20 जागाच जिंकता आल्या होत्या. या निकालाचं विश्लेषण केलं असता हरजोत कमल यांचा मोगा मतदारसंघात फार प्रभाव राहिला नसल्याचं काँग्रेस नेत्यांना वाटायला लागलं आहे.