किआरा अडवाणी करणार कर्रम…कुर्रम…

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी लिज्जत पापड आजपर्यंच्या वाटचालीवर सिनेमा बनवायचं ठरवलं आहे. या चित्रपटासाठी त्यांनी किआरा अडवाणीला मुख्य भूमिकेसाठी घ्यायचं ठरवलं आहे. किआराने देखील याला होकार दिला असल्याचं कळतंय. या चित्रपटामध्ये एका महिलेने घर चालवण्यासाठी धडपड करणाऱ्या सहा महिलांच्या मदतीने ही सहकारी चळवळ कशी सुरू केली हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

लिज्जत पापड हा महिला गृहउद्योग समूहाचे उत्पादन असून या समूहाने हिंदुस्थानी बाजारपेठेमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. पापड म्हटला की तो लिज्जतचाच असतो अशी धारणा या समूहाने तमाम हिंदुस्थानी जनतेच्या मनात निर्माण केली आहे. घराघरात पोहोचलेल्या या पापडाच्या मागची कथाही घराघरात पोहचावी असं बहुधा आशुतोष गोवारीकर यांना वाटलं असावं आणि म्हणूनच त्यांनी चित्रपटासाठी हा विषय निवडला असं सांगितलं जातंय. या चित्रपटाची निर्मिती सुनीता गोवारीकर करणार असून दिग्दर्शन ग्लेन बरेटो आणि अंकुश मोहला करणार आहेत.

गिरगांव भागातून या समूहाची सुरूवात झाली होती. 1959 साली सुरू झालेल्या महिला गृहउद्योह समूहाने देशातील असंख्य महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. गेली 6 दशके अव्याहतपणे या समूहाचं काम सुरू आहे. या समूहाचं मुख्यालय हे मुंबईमध्ये असून देशभरात या समूहाचे 27 विभाग आणि 81 शाखा आहेत.  सध्याच्या घडीला या समूहाची उलाढाल ही 800 कोटींच्या घरात असून 43 हजार महिलांना या समूहाने रोजीरोटी मिळवून दिली आहे.

पापड निर्मितीच्या कामाला पहाटे 4.30 वाजेपासून सुरूवात होते. महिलांना केंद्रावर आणण्यासाठी मिनीबस असून ती या महिलांना परत घरी देखील सोडते असं लिज्जत समूच्या प्रवक्त्याने सांगितले. समूहावर 21 सदस्यीय मंडळाचे नियंत्रण असते आणि शाखेचे नियंत्रण संचालिका करत असते असंही या प्रवक्त्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या