
जगभरात कोरोनाने अनेक सेलिब्रिटींना त्याच्या विळख्यात ओढले आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शहा हिला देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली होती. शेफाली यांच्या फेसबुक अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली होती. मात्र नंतर इंस्टाग्रामवरून शेफालीने तिचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे सांगत तिला कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शेफाली यांच्या फेसबुक अकाऊंटवरून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या हजारो चाहत्यांना त्यांना काळजी घेण्याचे संदेश पाठवले, अनेकांनी काही मदत लागल्यास कळवा असेही सांगितले. चाहत्यांच्या या प्रतिसादामुळे शेफाली या भारावून गेल्या असून त्यांनी इंस्टाग्रामवर चाहत्यांचे आभार माननारी एक पोस्ट शेअर केली आहे.
‘माझे फेसबुक अकाऊंट काल रात्री हॅक झाले. सकाळी उठले तेव्हा मला अनेक चाहत्यांचे, नातेवाईकांचे, निकटवर्तीयांचे मेसेज झाले होते. सर्व जण माझी काळजी घेत होते. माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी ते बोलत होते. यातील अनेकांना मी भेटले देखील नाही. काहींना कधीतरी, कार्यक्रमात भेटले आहे. जेव्हा असे मेसेज येतात तेव्हा कळतं की आपण किती महत्त्वाचे आहोत. पण मला किंवा माझ्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झालेली नाही. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. तुम्ही केलेल्या मेसेजबद्दल तुमचे धन्यवाद’, असे शेफाली शहा यांनी ट्विट केले आहे.