धक्कादायक! मुंबईत बॉलिवूड चित्रपट निर्मात्याची पत्नी व मुलीचे आत्मदहन

बॉलिवूडचे चित्रपट निर्माते संतोष गुप्ता यांच्या पत्नी व मुलीने मुंबईमध्ये आत्महत्या केली. अस्मिता गुप्ता आणि सृष्टी गुप्ता अशी मृतांची नावे आहेत. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, मुंबईतील उपनगर अंधेरी वेस्ट मधील डीएननगर भागामध्ये राहणारे चित्रपट निर्माते संतोष गुप्ता यांच्या पत्नी व मुलीने सोमवारी दुपारी स्वत:ला आग लावून आत्मदहन केले. शेजाऱ्यांना याबाबत कळताच त्यांनी अग्निशमन दलाच्या पथकाला फोन केला. यानंतर दोघींना कूपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी अस्मिता गुप्ता यांना मृत घोषित केले.

संतोष गुप्ता यांची मुलगी सृष्टी 70 टक्के भाजली होती. कूपर रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर तिला ऐरोली नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, अस्मिता गुप्ता या किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. यामुळे त्यांनी मुलीसह आत्मदहन केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आल्याची माहिती डीएन नगर पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी भारत गायकवाड यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या