बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेला कोरोना, 300 ते 400 लोकांची भेट घेतल्याच्या दाव्याने खळबळ

2636

बॉलिवूडमधील कलाकार कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करत असताना प्रसिद्ध गायिकेचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे. ‘रागिणी एमएमएस’ या चित्रपटात गायलेल्या ‘बेबी डॉल’ गाण्यामुळे फेसम झालेली गायिका कनिका कपूर हिला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

कनिका 15 मार्चला लंडनवरून लखनौला आली होती. परंतु विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने वॉशरूममध्ये लपून तिने तिथून पळ काढला होता. यानंतर तिने रविवारी एका पार्टीचे आयोजन केले होते आणि या पार्टीत तिच्या अपार्टमेंटमधील लोकांसह, लखनौ शहरातील अनेक मोठे अधिकारी, नेते सहभागी झाले होते. आता कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

लखनौला आल्यानंतर कनिका कपूर ताज हॉटेलमध्ये थांबली होती आणि तिने आपल्या अपार्टमेंटमध्ये पार्टी आयोजित केली होती. कनिका कपूरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या पार्टीत सहभागी झालेले लोक, नौकर-चाकर दहशतीखाली आहेत. तसेच अपार्टमेंटमधील लोक घर सोडून दुसरीकडे जात आहेत. या अपार्टमेंटमध्ये कनिका कपूर हिचे संपूर्ण कुटुंब राहते आणि या सर्वांना आता क्वारंटाइन करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागाने कनिकाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना फोन करून सेल्फ आयसोलेट होण्यास सांगितले आहे.

400 लोकांच्या संपर्कात आल्याचा दावा
दरम्यान, कनिका कपूरचे वडील राजीव कपूर यांनी केलेल्या एका दाव्याने आरोग्य विभागाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. लंडनवरून आल्या नंतर कनिका 3 ते 4 पार्टीमध्ये गेली होती. या दरम्यान ती 300 ते 400 लोकांच्या संपर्कात आल्याचा दावा राजीव कपूर यांनी आज तकशी बोलताना केला. मात्र कनिकाने हा दावा फेटाळून लावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या