शरीफांच्या घरवापसीपूर्वी पाकिस्तान हादरले, माजी सीएमच्या भावासह ११५ जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

भ्रष्टाचार प्रकरणामध्ये दहा वर्षाची शिक्षा झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांच्या देशवापसीपूर्वी सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. परंतु कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही सहा तासांच्या आत दोन स्फोटांनी पाकिस्तान हादरले आहे. दुपारी वजीरीस्तान भागात झालेल्या एका बॉम्बस्फोटात चार लोकांचा मृत्यू झाला तर त्यानंतर काहीच वेळात बलुचिस्तानमध्ये प्रचार रॅलीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत १११ लोकांचा मृत्यू झाला.

वजीरीस्तानमधील बन्नू जिल्ह्यामध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला. यात ४ लोकांचा मृत्यू तर ३२ लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये खैबर पख्तूनख्वा प्रातांचे माजी मुख्यमंत्री आणि जमीयन उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) चे नेते अकरम दुर्रानी यांचाही समावेश आहे. निवडणूक रॅलीमध्ये सहभागी होण्यासी दुर्रानी येथे आले होते. दरम्यान, सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

पहिल्या स्फोटानंतर काही तासांनी बलुचिस्तानमधील मस्तुंग येथे बलुचिस्तान अवामी पार्टीचे नेते नवाब सिराज रायसैनी यांच्या निवडणूक रॅलीमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात १११ लोकांचा मृत्यू झाला तर १३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निवडणुकीतील उमेदवार नवाब सिराज रायसैनी यांचाही समावेश आहे. सिराज हे बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाब असलम रायसैनी यांचे छोटे बंधू होते. सिरा यांचा मुलगा अकमल रायसैनी याचाही २०११ मध्ये बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. फुटबॉल मैदानात झालेल्या स्फोटात तो मारला गेला होता.