गडकरींवरील सर्वच आरोप निराधार नाहीत, हायकोर्टाने याचिका फेटाळली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लोकसभा निवडणुकीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेतील सगळेच आरोप निराधार नाहीत. त्यावर विस्तृत सुनावणी होणे आवश्यक आहे, असे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगतानाच गडकरी यांनी आपल्या विरोधात दाखल झालेली याचिका फेटाळून लावावी म्हणून केलेली याचिकाच फेटाळली आहे.

नितीन गडकरी यांनी 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी दिलेले शपथपत्र खोटे असल्याचा आरोप करत मतदार मो. नफिस खान यांनी  त्यांच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाखल केली होती. तसेच गडकरींनी मतदारांना आपल्या मालमत्तेची आणि मिळकतीची चुकीची माहिती देऊन निवडणूक जिंकल्याचेही याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, नफिस खान यांची याचिका फेटाळून लावावी म्हणून गडकरी यांच्या वतीने त्यांचे वकील वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर आणि अॅड. देवेन चौहान यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांनी गडकरींच्या वतीने दाखल केलेली याचिका गुणवत्ताहीन असल्याचे सांगत फेटाळली आहे. तसेच नफिस खान यांनी निवडणूक याचिकेसोबतच्या प्रतिज्ञापत्रातील 45-ए क्रमांकाच्या पानाची प्रत पुरवली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधत्व कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाले आहे याआधारे खान यांची याचिका फेटाळण्याची मागणी गडकरी यांच्या वतीने केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या