न्यायदेवतेचे आभार, आतातरी शिंदे गटाने शिवसेनेच्या मार्गात काळी मांजरं सोडणं बंद करावं! – राऊत

शिवसेनेची शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडित करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आज मुंबई उच्च न्यायालयात उधळला गेला. शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांची शिवसेनेविरोधातील याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेलाही खडे बोल सुनावले आणि शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी न्यायदेवतेचे आभार मानले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेला दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली आहे. न्यायदेवतेचे आम्ही आभारी असून न्यायालयात सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. आम्हाला दसरा मेळावा शिवतीर्थावरच साजरा करायची परवानगी मिळेल अशी खात्री, आत्मविश्वास होता, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठामपणे सांगत होते. उद्धव ठाकरे यांचा हा आत्मविश्वास खरा ठरला, असेही ते म्हणाले.

विनायक राऊत म्हणाले की, शिवतीर्थावर गेल्या अनेक वर्षापासून हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मेळावे झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सिमोल्लंघन केले. यावेळी मात्र भाजपने शिंदे गटाच्या माध्यमातून यात खोडा घालायचा प्रयत्न केला. शिंदे गटाच्या एका आमदाराने याबाबत याचिका केली होती. सुदैवाने ही याचिका फेटाळली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

शिवतीर्थावर विचारांचे सोने लुटायची बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली परंपरा उद्धव ठाकरे यांनी पुढे सुरू ठेवलेली आहे. यावर्षीही त्याच परंपरेला अनुसरण शिवतीर्थावर विचारांचे सोने लुटले जाईल, असेही राऊत म्हणाले. तसेच न्यायदेवतेने जो निर्णय दिले आहे त्यातून बोध घेऊन शिंदे गटाने शिवसेनेच्या मार्गात काळी मांजरं सोडणे बंद करावे. लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिलाय त्यात असे अडथळे आणण्याचे काम काम केले तर न्यायालय धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

सर्वोच्च न्यायालयात 27 सप्टेंबरला सुनावणी आहे. आमची बाजू न्यायाची आहे. सर्वोच्च न्यायालयातही न्याय देवता सत्याची बाजूने न्याय देईल, अशी खात्री असल्याचेही राऊत म्हणाले.

आमदारांना शांततेचे धडे द्या!

कायदा-सुव्यवस्था बिघडणार याची खबरदारी आम्ही प्रत्येकवेळी घेतो. परंतु दुर्दैवाने शिंदे सरकारमधील जे आमदार आहेत जे पिसाळले आहेत. दादागिरी, गुंडगिरी करताहेत. एकीकडे मारायची धमकी देताहेत आणि दुसरीकडे पोलीस स्थानकात पिस्तूलातून गोळ्या झाडताहेत. त्यांनी आधी आपल्या आमदारांना शांततेचे धडे द्यावेत. आम्ही मात्र न्यायालयाच्या निर्णयाशी बांधील असून शांतता राखण्याची जबाबदारी आमची असून ती आम्ही राखत आलो आहोत, असेही राऊत यावेळी म्हणाले.