हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाकडून दिलासा; दोन आठवडे अटक नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली होती. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी छापेमारी होती. ईडीच्या कारवाईविरोधात मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याशी संबंधित प्रकरणात हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. हसन मुश्रीफ यांना पुढील दोन आठवडे अटक न करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. मात्र मुश्रीफ यांच्यावरील खटला रद्द करण्याच्या याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली. याशिवाय अटकपूर्व जामिनासाठी मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयात योग्य अर्ज करण्यासही न्यायालयाने सांगितले.