तुमचा खटला कधी सुरु होईल व कधी संपेल याचा काहीच भरवसा नाही, असे खडेबोल सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) सुनावत उच्च न्यायालयाने एका आईला जामीन मंजूर केला. सिम्पी भारद्वाज, असे या महिलेचे नाव आहे. ईडीने गेल्यावर्षी या महिलेला अटक केली. गेले दहा महिने ही महिला कारागृहात आहे. तिला सहा वर्षांचा मुलगा आहे. या वयात मुलाला आईची गरज अधिक असते. अशा परिस्थितीत या महिलेला जामीन द्यायलाच हवा, असे नमूद करत न्या. मनिष पितळे यांच्या एकल पीठाने 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
ईडीला घाई नडली
या महिलेला 2018 मध्ये नोंदवण्यात आलेल्या गुह्यानुसार ईडीने गेल्यावर्षी अटक केली. मुळात त्यावेळी नोंदवण्यात आलेल्या गुह्यात या महिलेचे नावच नव्हते. या महिलेचे नाव पुढील तपासात 2019 व 2022 मध्ये समोर आले. त्याचा आधार ईडीने अटक करताना घेतलाच नाही. विशेष न्यायालयात अटकेचे कारण देताना ईडीने घाई केली. 2019 व 2022 मधील नोंद असलेल्या गुह्यांबाबत आम्हाला काहीच माहिती नाही, असा दावा ईडीने केला. या संपूर्ण कारवाईत ईडीने मुळ कायद्याची पायमल्ली केली, असे न्यायालयाने फटकारले.
विशेष सवलतीची तरतूद
ईडीने अटक केलेल्या आरोपीला जामीन देण्यासाठी मनी लॉड्रींग कायद्यात विशेष तरतूद करण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ देताना न्यायालयाने त्याचे विस्तृत कारण नमूद करायला हवे. सहा वर्षांचा मुलगा असलेल्या आईला जामीन नाकारणे योग्य ठरणार नाही. कायद्यातील विशेष सवलतीचा लाभ महिलेला देण्यात काहीच वावगे नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
साडेसहा कोटींच्या घोटाळ्यासाठी अटक
सुमारे साडेसाह हजार कोटींच्या बीटकॉईन घोटाळ्यात या महिलेच्या पतीला व सासऱ्याला अटक झाली. याप्रकरणी सुरुवातीला दोन गुन्हे दाखल झाले. त्यात या महिलेचे नाव नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने या महिलेच्या कुटुंबियांना अटक न करण्याचे अंतरिम आदेश दिले होते. तपास सुरु असताना यातील मुख्य आरोपीचे निधन झाले. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश रद्द करत आरोपींना विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज करण्याची मुभा दिली. त्यानंतर ईडीने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये महिलेच्या घरी छापा टाकला. त्यावेळी महिलेने गोंधळ घातला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ईडीने या महिलेला अटक केली. बीटकॉईनची माहिती गुंतवणूकदारांना देताना ही महिला अन्य आरोपींसोबत हजर होती. तिचा या गुह्यात सहभाग आहे, असा ईडीचा आरोप आहे.