पार्ट्यांमध्ये दारु ठेवू नका, असे उच्च न्यायालयाने महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठाला बजावले आहे. पार्ट्यांमध्ये जेवणासोबत दारु न देण्याची सूचना तक्रार निवारण समितीने केली आहे. या सूचनेचा गांभीर्याने विचार करा, असे न्यायालयाने लॉ विद्यापीठाच्या कुलगुरुंना सांगितले आहे.
न्या. अतुल चांदुरकर व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पार्टीसाठी जागा बघताना जेथे जेवणासोबत दारु मिळणार नाही, असे ठिकाण शोधायला हवे, अशी शिफारस तक्रार निवारण समितीने केली आहे. ही सूचना विद्यार्थी, कर्मचारी व विद्यापीठाच्या हिताची आहे, असेही खंडपीठाने नमूद केले.
लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीमुळे एका लॉ स्टुडंटचे नाव काढून टाकण्यात आले होते. त्याविरोधात या विद्यार्थ्याने याचिका केली होती. न्यायालयाने विद्यार्थ्याच्या शिक्षेत दुरुस्ती केली. अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतच ही शिक्षा लागू असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या विद्यार्थ्याचा अंतिम वर्षाचा निकाल जाहिर करण्याचे आदेशही न्यायालयाने विद्यापीठाला दिले आहेत.
करिअर संपेल
कारवाई करताना एखाद्या विद्यार्थ्याचे नाव कॉलेजमधून काढल्यास त्याला अन्य कोणत्याच महाविद्यालयात प्रवेश दिला जात नाही. अशा प्रकारची शिक्षा देणे म्हणजे विद्यार्थ्याचे करिअर संपवण्यासारखे आहे. तसे न करता अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ही शिक्षा कायम ठेवावी. त्या विद्यार्थ्याकडून समाजसेवा करुन घ्यावी, असे न्यायालयाने नमूद केले.
काय आहे प्रकरण
लॉ विद्यापीठाकडून पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत एका विद्यार्थ्याने मुलीसोबत गैरवर्तन केले. पीडितेने याची तक्रार केली. तक्रार निवारण समितीसमोर याची सुनावणी झाली. ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले गेले. संबंधित विद्यार्थ्यावर याआधीही अशाप्रकारचे आरोप झाले होते. तरीदेखील त्याचे वर्तन सुधारले नाही, असा ठपका ठेवत समितीने या विद्यार्थ्याचे नाव काढून टाकण्याची शिफारस केली. अभ्यासक्रमाची वर्षे पूर्ण झाल्याने त्याचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाने नकार दिला. त्याविरोधात या विद्यार्थ्याने याचिका केली होती.