राजकीय द्वेषापोटी एफआयआर नोंदवला! अनिल देशमुखांच्या याचिकेवर आज हायकोर्टात निकाल

परमबीर सिंह यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने थेट गुन्हा दाखल केला. मात्र हा गुन्हा राजकीय द्वेषापोटी केला असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेवर युक्तिवाद पूर्ण झाला असून या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालय उद्या गुरुवारी निकाल जाहीर करणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी परमबीर यांनी याचिकेद्वारे केली होती. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत सीबीआयला प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. असे असताना सीबीआयने देशमुख यांच्या निवासस्थानी छापा टाकून त्यांची नागपूर येथे चौकशी केली व त्यांच्याविरुद्ध थेट गुन्हाही दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख यांनी अॅड. सोनल जाधव यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून अनिल देशमुख यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी तर सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला.

आपली प्रतिक्रिया द्या