मुंबई विद्यापीठाचा गलथान कारभार पुन्हा चर्चेत, विधी शाखेच्या अंतिम सत्रांचे निकाल रखडले

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याचा फटका विधी शाखेच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना बसला आहे.

मे महिन्यात मुंबई विद्यापीठाने विधी शाखेच्या तृतीय वर्ष विधी पदवीमधील अंतिम सहाव्या सत्राच्या परीक्षा घेतल्या होत्या. सहाव्या सत्राच्या परीक्षा संपून तिसरा महिना सुरू झाला तरी अद्याप मुंबई विद्यापीठ विधी शाखेच्या सहाव्या सत्राचे निकाल जाहीर झालेले नाहीत. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा सहा जिह्यांमध्ये विधी महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. विधी शाखेतील तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होत असतात. त्याचबरोबर सर्वच विद्यार्थ्यांना न्यायालयात वकिली सुरू करण्यासाठी बार काwन्सिल ऑफ इंडियाच्या सप्टेंबरमध्ये होत असलेल्या परीक्षेला बसून त्यामध्ये उत्तीर्ण होऊन सनद मिळवणे क्रमप्राप्त असते. पुढील शिक्षणासाठी विदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता हे निकाल पत्रक हाती असणे गरजेचे असते.

विधीशाखेच्या तृतीय वर्ष अभ्यासक्रमातील अंतिम सहाव्या सत्राच्या परीक्षा मे मध्ये होऊन तिसरा महिना सुरू झाला तरी अद्याप विधीशाखेचे अंतिम सत्राचे निकाल जाहीर मुहूर्त मिळाला नाही.

तारीख पे तारीख..!

याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर विनोद पाटील यांच्याकडे वारंवार विचारणा केल्यानंतरही गेल्या पंधरा दिवसांपासून ते केवळ दोन दिवसांत निकाल लागेल. तीन दिवसांत निकाल लागेल, आज निकाल जाहीर होईल असे सांगत तारीख पे तारीख देत आहेत. यामुळे विधी शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.