बोनी कपूर आणि जान्हवी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्याला कोरोनाची लागण

1499

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि त्यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खळबळ उडाली. बोनी कपूर यांच्या मुंबईतील लोखंडवाला भागात असणाऱ्या ग्रीन एकर्स घरात काम करणाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या नंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आले असून बोनी कपूर, त्यांच्या घरातील सदस्य आणि इतर स्टाफ सुखरूप असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, चरण साहू असे पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने बोनी कपूर यांनी त्याला कोरोना चाचणी करण्यास सांगितले आणि आयसोलेशनमध्ये ठेवले. तपासणीअंती चरण याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर सोसायटीने महानगरपालिकेला याची माहिती दिली. बीएमसीने तात्काळ दखल घेत चरण याला क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.

दरम्यान, याबाबत प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना बोनी कपूर म्हणाले की, मी, माझी मुलं आणि घरातील इतर स्टाफ पूर्णपणे सुरक्षित आहोत. आमच्यात कोणालाही कोरोनाची लक्षण नाहीत. जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाले आहे, तेव्हापासून घरातून बाहेरही निघालो नाही, असेही त्यांनी स्पष्ठ केले. तसेच तात्काळ रिस्पॉन्ससाठी महाराष्ट्र सरकार आणि बीएमसीचे त्यांनी आभार मानले. तसेच उपचारानंतर चरण लवकरच सुदृढ होऊन पुन्हा आमच्या घरी येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या