छोट्या पडद्यामागे

43

>>अरविंद दोडे

हिंदी वाहिन्यांचे पत्रकार जेव्हा पडद्यामागील कथा लिहितात तेव्हा ‘ब्रेकिंग न्यूज’सारखा उत्कृष्ट संग्रह तयार होतो. पडदा आणि कॅमेरा यांच्याशी संबंध रोजच येत असल्याने प्रत्येक कथा वाचकाच्या मनःचक्षूंपुढे साकार होत जाते. काही कथांचा बाज उपरोधिक असल्याने त्यातील उपहास फार वेगळ्य़ा जातीचा आहे. तसे तर एकूणच टीव्ही पत्रकारांचे जीवन संघर्षाचे असते. तो काही कथांमध्ये आहे. त्यांचे दिवसाचे रंग वेगळे आणि रात्रीचे वेगळे असतात. त्या रंगांचे विनोद वेगळे. सुख आहे, दुःख आहे, धुंदी आणि मस्ती आहे. भाषा वेगळी, संवाद वेगळे, टिंगलटवाळी, राग, लोभ आणि भरभरून प्रेमही आहे.
पत्रकारांचा प्रामाणिकपणा या कथांतून अधिक जसा ठळकपणा समोर येतो तसाच धाडसीपणाही लक्षात राहण्यासारखा आहे. पडद्यामागील व्यावसायिक शब्द आपल्या परिचयाचे नसले तरी अखेरीस शब्दार्थ दिलेले आहेत, त्यामुळे कथा समजून घेण्यास अधिक सुलभ झाले आहे.

या संग्रहाचे संपादन राजेंद्र यादव, अजित अंजूम आणि रवींद्र त्रिपाठी यांनी केले आहे. एकंदर वीस कथांचा हा अनुभव एका अनोळखी जगाची ललितरम्य सफर घडवून आणतो. परवेझ अहमद, संगीता तिवारी, नीरेंद्र नागर, शालिनी जोशी, राणा यशवंत, संजीव पालीवाल, राजेश बादल यांच्या हृदयस्पर्शी कथा अविस्मरणीय आहेत. मुकेशकुमार यांची ‘टार्गेट’ ही प्रदीर्घ कथाही चित्तवेधक आहे.
उमा कुलकर्णी यांच्याप्रमाणे अनुवादक म्हणून चंद्रकांत भोंजाळ हे नावारूपास आले असून अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांचे हेही पुस्तक दखलपात्र आहे.

ब्रेकिंग न्यूज (कथासंग्रह)
संपादक : राजेंद्र यादव
अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ
प्रकाशक : विजय प्रकाशन, नागपूर
पृष्ठ : ??, मूल्य : ??

आपली प्रतिक्रिया द्या