पुस्तक परीक्षण

37

आविष्काराचा केंद्रबिंदू 

गोदाघाट या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहातून कवी भि. द. उशीर यांच्या भावना उत्स्फूर्तपणे दिसून येतात. या कविता मांडताना कवी म्हणतात, हृदयकपारीतून निपजणारा खरा भाव व्यक्त करणाऱ्या ओळींची शक्ती म्हणजेच कविता. त्यांच्या कवितांमधून हे ठायी ठायी व्यक्त होते. कवीचे बालपण ज्या गोदाकाठी गेले तिचं अस्तित्व, तो काळ, त्या भावना त्यांच्या कवितेमधून उमटल्या आहेत. या निसर्गाला साद घालणाऱ्या कविता जास्त दिसून येतात. कवीच्या जीवनातील चढउतार या कवितांमधून प्रतिबिंबित झालेले दिसतात. यामुळेच या कविता म्हणजे कवीच्या जीवनातील विरोधाभासांची प्रचितीच आहेत, असं वाटतं. हरवलेले चेहरे, सय माझी इतुकी पुरी, गुंता अशा काही कवितांमधून आपल्या मनोवस्थेचा प्रवास मांडण्याचा कवीचा प्रयत्न दिसून आला आहे. कोणतीही कविता ही कवीच्या आविष्काराची केंद्रबिंदू असते. गोदाघाटमधून आपल्यालाही याचा प्रत्यय येतो.

nishigandh

सकारात्मक आणि वाचनीय

कधी कधी वाचन हे केवळ निखळ आनंदासाठी करणं गरजेचं असतं. प्रत्येकवेळी वाचनातून बोध वा उपदेश मिळालाच पाहिजे असं नाही. अशा हलक्याफुलक्या विषयातून आपल्याला हवी असणारी सकारात्मकता कायम मिळत राहते. विरेंद्र प्रधानांचं निशिगंध हे पुस्तकही आपल्याला असाच निखळ आनंद देतं. यातील काही विषय हे थोडेसे बोजड असतीलही पण लेखकाने त्यांची मांडणी अगदी सुटसुटीत केली असल्याने ते वाचनीय झाले आहेत. खरंतर लेखकाने रोजच्या जगण्यातील महत्त्वाचे विषय यातून मांडले आहेत. यात सरले सारे शैशव तयांचे, भारतीय समाजात स्त्रीयांचे स्थान, शिक्षणाचं चांगभलं अशा विषयांना लेखकाने हात घातला आहे. मात्र लेख समस्याप्रधान न होता माहितीपूर्ण झाले आहेत. हे पुस्तक म्हणजे अशा विविध विषयांचे संकलन आहे. याबरोबरच रविवारचा राम मारुती रोड, नाते तुझे नि माझे, सुसंगती सदा घडो असे काही लेख नक्कीच आवडतील असे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या