गीतलेखनाचा अवीट प्रवास

230

>>प्रा. कृष्णकुमार गावंड

नाटककार मधुसूदन कालेलकर हे नामवंत अष्टपैलू साहित्यिक होते. म्हणूनच त्यांनी गाजविलेली कारकीर्द नाट्य़रसिकांना परिचित आहेच; परंतु मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही कालेलकरांनी कथा-पटकथा-संवाद लेखन केलेलं आहे. या व्यतिरिक्त त्यांचं महत्त्वाचं योगदान म्हणजे गीत लेखन. मराठी चित्रपट गीते म्हणजे ग. दि. माडगूळकर हे समीकरण दीर्घकाळ कायम होतं. त्यानंतर जगदीश खेबूडकर यांनी एक काळ गाजविला होता; परंतु याच कालखंडात कालेलकरांनी मराठी चित्रपटासाठी मोठे योगदान दिले आहे. परंतु त्यांचं व्हावं तेवढ कौतुक झालं नाही. ही खंत प्रसिद्ध संगीतकार अनिल मोहिले यांनी काही वर्षांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली होती. एवढंच नव्हे तर कालेलकरांचे सुपुत्र अनिल यांना कालेलकरांनी लिहिलेल्या गाण्यांचं पुस्तक संकलित करावं, अशी प्रेमळ विनंती केली आणि कालेलकरांच्या जयंतीनिमित्त १९ मार्च रोजी लेखक-पत्रकार रमेश उदारे यांनी या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले. त्यांनी ‘निंबोणीच्या झाडामागे’ हे पुस्तक संपादित करून ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे-नाईक यांच्या हस्ते प्रकाशन केले.

या पुस्तकात कालेलकरांनी २५ चित्रपटांसाठी लिहिलेल्या ६६ गाण्यांचा समावेश असून त्यांनी लिहिलेल्या नाटय़गीतांचाही समावेश आहे. तसंच गाण्यासंबंधी अनेक आठवणी मान्यवरांनी लिहिलेल्या आहेत. यामध्ये लेखक-दिग्दर्शक दत्ता केशव, गीतकार प्रा. प्रवीण दवणे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेत्री आशा काळे-नाईक, ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर, सिनेअभ्यासक अरुण पुराणिक, विवेक पुणतांबेकर, ज्येष्ठ पत्रकार लेखक मधु पोतदार, नाटककार अशोक समेळ, रवींद्र आवटी यांनी प्रामुख्याने उल्लेखनीय आठवणी लिहिलेल्या आहेत.

कालेलकरांचे धाकटे बंधू अनंतराव कालेलकर (माझा अण्णा) यांच्या लेखातून कालेलकरांची जडणघडण, लेखन कारकीर्द, कौटुंबिक नाती, त्या काळातले वातावरण अलगदपणे उलगडलं आहे. यातील ‘अखेर जमलं’ या कालेलकरांच्या पहिल्या चित्रपटासाठी लतादीदींनी गायलेल्या गाण्याचं रेकॉर्डिंग व त्यासंबंधीचा किस्सा फारच छान रंगवलेला आहे. विविध विषयांवरील विविध प्रकारची उत्कृष्ट गाणी लिहिण्याचा कालेलकरांचा गीत लेखनाचा प्रवास उलगडतो. ‘पतिक्रता’मधील शास्त्रीय शैलीची गाणी, ‘पारध’मधलं रोमॅण्टिक गीत तर लहान मुलांशी संबंधित ‘अ आ आई’, ‘ठाउैक नाही मज काही’ यासारखी गाणी त्यांच्या लेखणीतील विविधता दाखवितात. हिंदीतील नामवंत मुकेश यांनी म्हटलेलं एकमेव मराठी गाणं त्यांच्या ‘सप्तपदी’ चित्रपटातलं. ‘एकदा येऊन जा, एकदा भेटून जा’, तसंच ‘अ आ आई म म मका’ म्हटलंय मन्ना डे यांनी तर ‘अपराध’मधलं ‘सूर तेच छेडता’ महेंद्र कपूर यांनी म्हटलंय. मराठी माणसाला ही गोष्ट अभिमानाची वाटली आहे.

पुस्तकाच्या निर्मितीमध्ये अनेकांचे सहकार्य लाभलेलं आहे, असा उल्लेख लेखक रमेश उदारे मनोगतात करतात. कालेलकरांच्या ‘नाट्य़वैभव’ संस्थेचे व्यवस्थापक वसंत इंगळे यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी केलेली धावपळ कौतुकास्पद आहे. दुर्मिळ गाणी व छायाचित्रे उपलब्ध करून देणारे दीनानाथ घारपुरे, सुबोध गुरुजी, नारायणराव फडके, रमेश साळगावकर यांचेही सहाय्य लाभल्याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे.
‘निंबोणीच्या झाडामागे’ या अंगाई गीताचा अनुभव अनेक पिढय़ा घेत आहेत. म्हणूनच पुस्तकाचं हे शीर्षक समर्पक आहे. चित्रकार सतीश भावसार यांनी काढलेलं पुस्तकाचं मुखपृष्ठ आकर्षक आहे.

निंबोणीच्या झाडामागे
संपादन : रमेश उदारे
प्रकाशक : अनघा प्रकाशन
मूल्य : १८० रु., पृष्ठ : १६४

आपली प्रतिक्रिया द्या