स्वप्नांचा मिरग

178

>> वैशाली पंडित

डॉ.सई लळीत या कवयित्री आणि विनोदाची फांदी झाडावर रसरशीत ठेवणाऱया लेखिकेची ‘मिरग’ ही कादंबरी नुकतीच वाचून संपवली. नावातूनच ती मालवणी पार्श्वभूमीवरची असल्याचे लक्षात येते. हा मिरग दुःखाचा उन्हाळा संपवणाऱया आशादायी स्वप्नांचा आहे. यात दुसरेपणावर नाइलाजाने लग्न करायला लागलेल्या आशा नावाच्या एका बुद्धिमान, आईबापांवर जीवापाड प्रेम असलेल्या, समंजस, चुणचुणीत मुलीची परिस्थितीमुळे झालेली कुचंबणा रेखाटली आहे, पण हा कथेचा उत्तरार्ध आहे. पूर्वार्धातील बराच मोठा भाग आशाचं घर, तिची ओढग्रस्त परिस्थिती, तिचं साधंसुधं कौलारू, सारवणाचं घर, त्यातली तिची कष्टाळू आई, कष्टाळू असूनही कधीकधी दारूचा आसरा घेणारे वडील याभोवतीचे चित्रण करतो.

कादंबरीत गावाकडचे सारे तपशील लेखिकेने फार बारकाव्याने, सुरसपणे मांडले आहेत. मालवणी मुलुखातले २० वर्षांपूर्वीचे खेडे तिने जसेच्या तसे उचलून कादंबरीत वसवले आहे. यातली पराकोटीची संवेदनशीलता लेखिकेने अपूर्वाईने नोंदली आहे. आशाला शिक्षिका होण्यासाठी डी. एड. करायचे आहे. पण वडिलांना आलेला हृदयविकाराचा झटका आणि पंगुत्व घरादाराच्या स्वप्नांनाच जागेवर बसवते. परवडणारे नाही म्हणून आशा समजूतदारपणे आपले शिक्षण थांबवते. तेव्हा वाचकही हळहळतो.

वडिलांना आपल्या डोळय़ासमोर पोरीवर अक्षता पडाव्यात हा ध्यासच लागतो. जनरीतीप्रमाणे आशाचे दाखवण्याचे कार्यक्रम होतात. गुणांपेक्षा पैशाला महत्त्व देणाऱया स्थळांकडून आशाला नकार पचवावा लागतो. तिच्या भावाला बहिणीचा हा अपमान सहन होत नाही. आपण पोरींचे असे प्रदर्शन करणार नाही. सांगून आलेल्या पहिल्याच पोरीशी लग्न करणार असे बजावतो. स्त्र्ााr सन्मानाचा हा चाकरमान्याच्या तोंडून होणारा उच्चार अर्थातच सुखावह आहे. पण आशासाठी आता त्याचा उपयोग नाही.

अखेरीला बिनपैशाचे पण दुसरेपणाचे स्थळ चालून येते. आईची तडफड होते, पण घरादाराला ऋणात राहावे लागू नये म्हणून जिवावर उदार होऊन… गेली ती सवत नव्हे तर, आपली बहीण मानून आशा या लग्नाला होकार देते. श्रीकांतचे हे दुसरे लग्न आहे. तो लग्नाच्या बाबतीत कमालीचा उदासीन आहे. ती नवी नवरी कोमेजून जाते. मुळात आशा सुस्वभावी, हळवी, विचारी, समंजस, कामसू आहे, पण त्या कोणत्याही गुणांची दखल नवरा घेत नाही. तो कोंडमारा तिला असहय़ होतो. हे नकोसे जगणे आता आपण नाकारायचे या निर्णयाला आशा येते आणि एकदा रात्री सगळीकडे सामसूम झाल्यावर पायीच झपाटल्यासारखी अंतर तुडवून माहेरी निघून येते. आजारी पडते. लगेचच तिचा नवरा तिला न्यायला येतो आणि आशाच्या स्वप्नाचा ‘मिरग’ सुरू होतो. इथे कादंबरी संपते. मला कादंबरीचा शेवट हा घाईघाईने केल्यासारखा वाटतो.

श्रीकांतला जेव्हा समजते आशा घरात नाही तेव्हाची त्याची मनातली पडझड… प्रथम पत्नीची मनातली जागा आशाला देऊ करण्यापर्यंतचा मनाचा प्रवास अजून खोलात उतरून करायला हवा होता असे वाटले. हा प्रवासही आशाच्या संयमीपणाचा, गुणांचा परिणाम म्हणूनच झाला आहे हे अधोरेखित व्हायला हवे होते. याने आशाच्या कुचंबणेला न्याय मिळाला असताच पण कादंबरी अजून थोडी उंचीवर गेली असती.

यातली अजून थोडी ही अपेक्षा सईकडूनच करावी इतक्या गुणाची ही लेखिका आहेच. कादंबरीतल्या अनेक प्रादेशिक, भाषिक जागा तिने लालित्याने समोर आणल्या आहेत. कादंबरीतील संवादाची मालवणी भाषा वाचताना अतीव गोड लागते. मालवणी मातीचा कण नि कण यातल्या व्यक्तिरेखांना बिलगलेला आहे. सईकडून एक सुघड कादंबरी भेटीदाखल मिळाली आहे. वाचकांवर असा ‘मिरग’ सतत बरसावा ही तिला तिच्या पुढच्या लेखनासाठी मनापासून शुभेच्छा!

‘मिरग’ (कादंबरी)
लेखिका – डॉ. सई लळीत
प्रकाशन – ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.
पृष्ठ – ११४
किंमत – १३० रुपये

आपली प्रतिक्रिया द्या