दोघांचं जग

283

>> डॉ. विजया वाड

पुस्तकांच्या आनंदाच्या जगात जेव्हा प्रेमरंग मिसळतो तेव्हा दोघांचं जग सुगंधी होऊन जातं.

प्रिय वाचकांनो,
‘सारस्वत’च्या निमित्ताने मला 51 पुस्तके वाचायला मिळाली. ‘सामना’तील त्या त्या पुस्तकाचा अभिप्राय वाचून वाचक ‘ते’ पुस्तक वाचायला मागतात हे ग्रंथपालांनी मला जेव्हा सांगितले तेव्हा मला साहजिकच आनंद झाला.या सदराचा मी माझ्या कथेने शेवट करतेय. कारण ‘गोष्ट’ हा तर तुमच्या माझ्यामधला दुवा आहे, खरं ना?
तिचं जग
‘‘मला पुस्तके वाचायला आवडतात.’’ मनोहर म्हणाला होता.
‘‘अय्याss’’ आनंदीनं खुर्चीतून उठून एक गिरकी घेतली.
‘‘आनंदी अशीच आहे पुस्तकवेडी. आपल्याला दाखवायला आणलंय हेही विसरली बघा.’’ आनंदीचे वडील मनोहरला म्हणाले.
‘‘तुमच्याकडे खूप पुस्तकं असतील ना मनोहर?’’
‘‘दोन कपाटं खच्चून भरली आहेत.’’ तो अभिमानाने म्हणाला.
‘‘हो का? माझ्याकडे पाच कपाटं! मी लग्नानंतर ती सर्वच्या सर्व पुस्तकं आपल्या घरी आणणार हं.’’
आनंदीचे आई-बाबा बघतच राहिले आनंदीकडे.
‘‘अल्लड आहे ती अजून.’’ आनंदीची आई मनोहरला म्हणाली.
‘‘आमचा मुलगाही पुस्तकवेडाच आहे. त्यामुळे समसमा संयोग आहे.’’ मनोहरची आई म्हणाली. ते ऐकून आनंदीचे आई नि बाबा यांचा जीव भांडय़ात पडला.
‘‘माझी पुस्तक पंढरी राहील ना तुमच्यात?’’ आनंदीनं विचारलं.
‘‘राहील हो. आम्ही वेगळे राहतो. मनोहर वेगळा राहतो.’’
मनोहरचे बाबा म्हणाले ‘‘का?’’ कोणीच प्रश्न विचारला नाही.
खयाल अपना अपना! हल्ली अशीच पद्धत आहे शहरातून. राजा-राणी ट्रव्हल्स हो! काय करायचं ते करा.
असं ते मनोहर या वाचनवेडय़ाचं आनंदी या वाचनवेडीशी लग्न ठरलं. ठरलं ठरलं आणि झालंदेखील.
‘वंदना’ या चाळीत आनंदी मनोहरच्या दोन खोल्यांत राहायला आली. आई-बाबा मनोहरचे वरच्याच मजल्यावर राहत होते. आनंदी आली म्हणून खाली उतरले. मनोहरच्या आईने औक्षण केले आणि तेवढय़ात तीन टेम्पो आले.
‘‘हे गं काय?’’
‘‘माझी पुस्तकांची कपाटं!’’ आनंदी कौतुकाने म्हणाली. मनोहरनं ती कपाटं कशीबशी बाहेरच्या खोलीत लावली.
‘‘आता ना मनोहर, अख्ख्या चाळीला आपण खुले ग्रंथालय अगदी मोफत ठेवूया.’’
मनोहर सर्वांदेखत फटकारत म्हणाला, ‘‘एक महिना जाऊ दे.’’
‘‘का रे?’’
‘‘अगं आपल्याला प्रायव्हसी नको का?’’ तो चिडला.
‘‘कशाला प्रायव्हसी?’’
‘‘प्रेम करायला!’’ त्याने धाडसाने म्हटले.
‘‘पण माझं पहिलं प्रेम पुस्तकांवर आहे हं!’’
‘‘अगं पण आता लग्नानंतर प्रायॉरिटी बदलायला हवी गं! आय शूड बी फर्स्ट! बुक्स लेटर.’’
‘‘तुझंही तस्संच हवं!’’ ती म्हणाली.
घरात आल्या आल्या तिनं मनोहरचं कपाट उघडलं.
‘‘अय्याss’’ ती चित्कारली.
‘‘काय झालं गं?’’
‘‘आम्ही आणि आमचा बाप! नरेंद्र जाधव.’’ वाऊ! तुला मिळालं? मला नाहीच मिळालं विकत. सतत एकच उत्तर ‘संपले आहे’. असे कितीदा वाचले नि कितीदा रडलेय मी. इतका आनंद झाला ना!’’ तिनं एक फ्लाईंग किस त्याला पाठवला ‘‘उम्माss’’ करीत. मग आनंदीचे आईबाबा घरी नि मनोहरचे माता-पिता जिना चढून वरल्या अंगाला गेले.
‘‘आज पाणी आलं नाही गं चाळीत. मी जरा बाहेर जाऊन थोडी वाणसामानाची खरेदी करून येतो.’’ मनोहर म्हणाला.
मनोहर गेला. पाणी आलं की कळावं म्हणून आनंदीनं नळ सुट्टा ठेवला नि फतकल मारून ती पुस्तकं बघत राहिली मनोहरची. ‘आम्ही नि आमचा बाप’ तर तिचं प्राणप्रिय पुस्तक. तिनं आसन जमवलं नि ते पुस्तक हाती घेतलं. वाचनात दंग झाली. मनोहर घरी आला तर… तर… तर…
‘‘अगं आनंदी… नळ सुट्टाय का?’’ तो धास्तावला.
‘‘तू काय वाचतीयस कॉटवर मांडी घालून?’’ तो ओरडला.
‘‘आम्ही आणि आमचा बाप!’’ ती म्हणाली.
‘‘माझे बाई, खाली तळं झालंय तळं!’’
‘‘तळं?’’ तिनं पाहिलं. नळाला पाणी आलं? खाली तळंच साचलं? तिनं मोठ्ठा गळा काढला. तिचं जग भिजू भिजू हो!
‘‘मनूss माझी पुस्तकं तळय़ात वाहतायत रेss.’’
आता त्याला समजेना, पुस्तकं बघू, नळ बंद करू की नव्या नवेल्या आनंदीला जवळ घेऊन तिचे डोळे पुसू? ‘‘अरे नळ बंद कर नि पुस्तकं उचल!’’ ती रडत ओरडली. जणू त्याचीच चूक होती, पण त्याने आज्ञापालन केले नि कॉटवर चढत तिला घट्ट जवळ घेतले. दरवाजा उघडाच. शेजारच्या काकूंनी बघ्यांना परतवले. ‘‘तुमचं नवं नव्हतं का रे कधी?’’ त्या ओरडल्या नि हळूच दरवाजा बंद केला.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या